Newborn Baby Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Child Mortality: अहिल्यानगरमध्ये बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक; चार वर्षांत अडीच हजारांहून अधिक मृत्यू

कुपोषण, अपुरी आरोग्यसेवा आणि प्रसूतीपूर्व काळजीअभावी वाढता धोका; प्रशासनासमोर मोठे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण अजूनही चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता बालमृत्यूची संख्या सातत्याने मोठी असल्याचे दिसून येते. गेल्या चार वर्षात सुमारे अडीच हजारांहून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या सुचनांनुसार, आरोग्य विभागाकडून मातृ-बाल आरोग्य योजना, लसीकरण मोहिमा, पोषण आहार कार्यक्रम राबवले जात असतानाही बालमृत्यूचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. ग्रामीण भागातील कुपोषण, वेळेवर उपचार न मिळणे, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची योग्य काळजी न घेणे, तसेच काही ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता, ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.

विशेष म्हणजे 2023-24 मध्ये बालमृत्यूची संख्या सर्वाधिक 679 इतकी होती. त्यानंतर 2024-25 मध्ये किंचित घट झाली असली तरी ती अजूनही चिंताजनक पातळीवर आहे. चालू वर्षातील आकडे पाहता वर्षअखेर हा आकडा पुन्हा 600 पेक्षा जास्त जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गर्भवती मातांची नियमित तपासणी, नवजात बालकांची विशेविशेष काळजी, कुपोषणावर प्रभावी उपाययोजना आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची मजबुती या बाबींवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट गाठणे कठीण होणार आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही यंत्रणेसमोरील मोठी जबाबदारी ठरत आहे.

गरोदर महिलांवरील खर्चाचे फलित काय?

महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरोदर महिलांच्या आहारावर दर वर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो. विशेषतः आदिवासी पट्ट्यात पोषण आहार, अतिरीक्त पोषण आहारासाठी योजना घेतल्या जातात. मात्र, त्याचे फलित काय? माता मृत्यू, बालमृत्यू, कुपोषण सध्यस्थिती काय, लाभार्थी यादी काय सांगते, पोषण आहार कुठे, कसा दिला जातो, याचा सीईओ कधीतरी ग्राऊंडवर आढावा घेणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बालकांचा जन्मानंत्तर काही तासांत मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. कमी वजन, वेळपूर्वी प्रसूती अशा विविध कारणांचा यात समावेश आहे. त्यामुळेच गरोदर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जवळच्या आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात जाऊन वेळोवेळी तपासणी करून घेणे अपेक्षित आहेत. पोषणआहार घेण्याची गरज आहे.
डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT