नगर: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपाच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या वेगवेगळ्या नावावरील चर्चांना आता पूर्णविराम मिळताना दिसत आहे. काल रात्री मुंबईत नगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. प्रदेशाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांची मते जाणून घेतानाच, जर पक्षात कोणी येत असेल आणि त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असेल, त्याचा स्वीकार केला पाहिजे.
त्यामुळे नगरच्या उमेदवारीसाठी पक्ष जे नाव देईल, त्यांना विजयी करा, अशा शब्दात जणू ‘प्राजक्त तनपुरे’ यांच्या नावावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले. दरम्यान, बैठकीतून प्राप्त माहितीनुसार, पक्षनेतृत्वाने तनपुरेंच्या उमेदवारीचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. आज शुक्रवारी पक्षाची अधिकृत उमदेवारांची यादी येणार असून, उद्या शनिवारी (दि. 30 रोजी) तनपुरेंचा मुंबईत प्रवेश होणार असल्याचेही एका जबाबदार पदाधिकाऱ्याने खासगीत सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकट्या भाजपाकडे 461 पैकी 199 मतदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडून भाजपाने खेचून आणण्यात यश मिळवले आहे. आता भाजपाची उमेदवारी कोणाला, यावरून वेगवेगळी नावे पुढे येत होती.
सत्यजित कदम यांच्यासह प्रा. भानुदास बेरड, डॉ. राजेंद्र वेिखे, अभय आगरकर आदी नावांची चर्चा सुरू दिसली. भाजपाचा एक गट यातूनच, निष्ठावंताला संधी मिळावी, यासाठी आग्रही होता, तर दुसरा गट मात्र, प्राजक्त तनपुरे यांना भाजपात प्रवेश देऊन पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांच्यासाठी पुढाकार घेत असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे भाजपामध्येच दोन मतप्रवाह दिसून आले. परिणामी, उमेदवारीचा सस्पेन्स वाढत असल्याचे दिसले. मात्र, यातून अंतर्गत धुसफूस वाढतच होती. पक्षांतर्गत नाराजी नको, म्हणूनच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत, काल गुरुवारी सायंकाळी 7 वाजता मुंबईत बैठक बोलाविली होती. ही बैठक मंत्री विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित केली होती. बैठकीसाठी आमदारांसह नगराध्यक्ष, गटनेते, जिल्हाध्यक्ष व इच्छुकांना निरोप देण्यात आले होते. उमेदवारीसाठी दावा ठोकणारे सत्यजित कदम हेही मुंबईकडे रवाना झाले होते. सायंकाळी ही बैठक सुरू झाली होती.
या बैठकीसाठी आ. मोनीका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आ. विक्रमसिंह पाचपुते आदींसह जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नितीन दिनकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पक्षाने आदेश दिल्यावर त्याचे पालन करायला हवे. युती सरकार स्थापन करताना देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपदापासून थांबण्याचा निर्णय घ्यावा लागला होता, त्यामुळे कोणावरही भाजपात अन्याय होत नाही. आमदार कर्जतकर यांच्या निष्ठेलाही पक्षाने फळ दिलेच, याची आठवण करून देताना पक्षवाढीसाठी कामे करा, असे आवाहन करताना प्राजक्त तनपुरे यांचा प्रवेश होऊ शकतो, असेही संकेत दिले. पक्ष देईल, तो उमेदवार विजयी करा. सर्वांनी एकदिलाने काम करा, असेही सांगितले.
मुख्यमंत्री समजूत काढणार..
सत्यजित कदम यांनी उमेदवारीसाठी निष्ठावंत म्हणून आपल्याला संधी मिळावी, याकडे लक्ष वेधले होते. बैठकीत बोलताना कदम यांनी तनपुरेच्या भाजप प्रवेशाला माझा विरोध नाही. मात्र त्यांना पक्षप्रवेश देवून थेट उमेदवारी देण्याला माझा विरोध आहे. पक्षाने निष्ठावंतांचाही विचार करायला हवा, अशी भूमिका मांडली. तसेच मला पक्षाचा एबी फार्म नाही दिला तरी चालेल, मात्र निवडणूक लढण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी त्यांनी बैठकीत केली. त्यावर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी त्यांना बैठकीनंतरही थांबवले होते. आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सत्यजित कदम यांच्याशी चर्चा करणार आहेत. या बैठकीतून कदम यांची नाराजी दूर केली जाणार असल्याचेही सांगितले जाते. बैठकीनंतर देवळाली प्रवराचे भाजपाचे गटनेते प्रकाश संसारे यांनी सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आमची पक्षाकडे मागणी आहे, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आशावादी आहोत, असे सांगितले.