नगर: जानेवारी 2024 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 2024 व 2025 या दोन वर्षांत मुदत संपलेल्या 100 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत यापूर्वीच झालेली असताना राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा आरक्षण सोडत घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार 12 जूनपर्यंत 870 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहे. 10 जुलै रोजी प्रभागनिहाय अंतिम आरक्षण प्रसिध्द होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 770 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना कार्यक्रम हाती घेऊन तो अंतिम केला होता. राज्य निवडणूक आयोगाने 770 ग्रामपंचायतींबरोबरच गेल्या दोन वर्षांतील शंभर अशा एकूण 870 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार 12 जून 2026 रोजी 870 गावांत आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतनिहाय आरक्षण सोडतीचे प्रारुप 19 जून रोजी प्रसिध्द केले जाणार आहे. या प्रारुप आरक्षणावर 25 जूनपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. प्राप्त हरकतीवर प्रांताधिकारी सुनावणी घेणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी 8 जुलैपर्यंत अधिसूचनेस मान्यता देणार असून, त्यांच्या मान्यतेनंतर 10 जुलै 2026 रोजी 870 ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय अंतिम आरक्षण प्रसिध्द होणार आहे.
2026 मधील संख्या
अकोले 52, संगमनेर 94, कोपरगाव 29, श्रीरामपूर 27, राहाता 25, राहुरी 44, नेवासा 59, नगर 60, पारनेर 88, पाथर्डी 79, शेवगाव 48, कर्जत 55, जामखेड 49, श्रीगोंदा 62.
...यामुळेच शंभर ग्रामपंचायतींचे पुन्हा आरक्षण
2024 या वर्षात 85 तर 2025 या वर्षात 15 अशा शंभर ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपलेला आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी या शंभर ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना, आरक्षण सोडत तसेच मतदारयादी कार्यक्रम आदी प्रक्रिया पूर्ण झालेली होती. या ग्रामपंचायतींचे समर्पित आयोगानुसार आरक्षण सोडत काढण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने समर्पित आयोगाची अधिसूचनाच रदृ केली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 100 ग्रामपंचायतींची नव्याने आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.