Sugar Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar African Sugar: अहिल्यानगरच्या किराणा दुकानांत ‘आफ्रिकन साखरे’ची चर्चा; जाड दाण्यांची साखर पाहून ग्राहक बुचकळ्यात

७० रुपये किलोने विक्री; साखरेच्या दाण्यांचा आकार मोठा, चहात लवकर विरघळत नसल्याने गृहिणींच्या अडचणी वाढल्या

पुढारी वृत्तसेवा

नगर: नेहमीच्या बारीक, शुभ्र आणि एकसारख्या दाण्यांच्या साखरेची सवय असलेल्या अहिल्यानगरकरांना सध्या किराणा दुकानांमध्ये दिसणारी जाड दाण्यांची साखर पाहून आश्चर्याचा धक्का बसत आहे. काही दुकानांमध्ये ही साखर ग्राहकांना उपलब्ध करून दिली जात असून, ‘आफ्रिकन साखर आहे’ अशी चर्चा ग्राहकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे साखर खरेदी करताना ग्राहकांकडून तिच्या प्रकाराबाबत दुकानदारांकडे विचारणा केली जात आहे. साखरेच्या दाण्यांचा आकार नेहमीच्या साखरेपेक्षा मोठा असल्याने अनेक ग्राहक ही साखर घेण्यास कचरत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून साखरेचा तुटवडा जाणवत असल्याने दरात प्रचंड वाढ झाली आहे. देशातील साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने १० लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या आयातीला शुल्कमुक्त परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आयात झालेल्या साखरेची चर्चा वाढली आहे.

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील काही किराणा दुकानांमध्ये जाड दाण्यांची साखर उपलब्ध झाल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नेहमी बारीक साखर वापरणाऱ्या गृहिणींना या साखरेचा आकार वेगळा वाटत आहे. 70 रुपये किलो दराने ही साखर विक्री केली जात आहे. या साखरेबाबत जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, आपल्याकडे अशा जाड साखरेची विक्री केली जात नाही, ही साखर दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेली आहे, अशी माहिती हाती आली.

त्यामुळे ‘आफ्रिकन साखर’ म्हणून तिची दुकानदारांकडूनही माहिती ऐकल्याने ग्राहकांनी खरेदीपूर्वी अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. उसापासून साखर बनवताना 'क्रिस्टलायझेशन' म्हणजेच साखरेचे दाणे तयार करण्याची एक प्रक्रिया असते. उसाचा रस उकळून जेव्हा तो घट्ट केला जातो, तेव्हा त्यात साखरेचे छोटे कण टाकले जातात. हा रस व्हॅक्यूम पॅनमध्ये जितका जास्त वेळ आणि विशिष्ट तापमानावर शिजवला जातो, तितके साखरेचे दाणे आकाराने मोठे आणि जाड बनतात.

लवकर विरघळत नाही

साखरेचे तीन प्रकार आहेत. सर्वात बारीक स्मॉल S, मध्यम बारीक मिडीयम M आणि सर्वांत जाड लार्ज L आकार आहे. जाड साखरेचा उपयोग मिठाई, बेकरी, पाक बनवणे इत्यादीसाठी केला जातो. पाण्यात ही साखर लवकर विरघळत नाही. त्यामुळे सध्या ही साखर गृहिणींना चहामध्ये वापरावी लागत असल्याने वेगवेगळे प्रश्न तयार होऊ लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT