Abhishek Kalamkar rape case Pudhari
अहिल्यानगर

Abhishek Kalamkar Anticipatory Bail: माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

अहिल्यानगर सत्र न्यायालयाचा निर्णय; यापूर्वीचे तीन अर्जही फेटाळले, प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि कोठडीतील चौकशीचा मुद्दा

Sakshi Kadam

नगर: माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकरचा अटकपूर्व जामीन अर्ज अहिल्यानगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी हा आदेश पारित केला. यापूर्वीही अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेले अर्ज फेटाळण्यात आल्याने आरोपीला पुन्हा एकदा न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही.

कळमकर विरोधात अहिल्यानगर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात २१ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ६४(१), ६४(२), ६९ व ३५१(२), तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६ई अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान मूळ फिर्यादीतर्फे गुन्ह्याचे गांभीर्य, प्रकरणाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि तपासाच्या दृष्टीने आरोपीच्या कोठडीतील चौकशीची आवश्यकता या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला होता.

याशिवाय, गुन्ह्यानंतर आरोपीविरुद्ध अशाच स्वरूपाचा आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आल्याची बाबही पीडित महिलेच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि दोन्ही बाजूंनी मांडण्यात आलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. फिर्यादीतर्फे ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी काम पाहिले.

यापूर्वीचे तीन अर्जही फेटाळले

आरोपी कळमकर याने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात एकदा आणि अहिल्यानगर येथील सत्र न्यायालयात दोनदा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. हे तिन्ही अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर सत्र न्यायालयात दाखल केलेला त्याचा तिसरा आणि एकूण चौथा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT