

जामखेड: जामखेड शहरात तुळजाभवानी मातेच्या पलंग दर्शनासाठी भाविकांच्या झालेल्या गर्दीत ३२ गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपीने पोलिसावर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी पोलिस हवालदारावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे जामखेडमधील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोप करत आ. रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. कुलदीप घोळवे असे जखमी पोलिस हवालदाराचे नाव आहे.
जामखेड नगरपरिषदेच्या नवीन इमारतीजवळ देवी पलंग दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. या गर्दीत पाकिटमार घुसल्याचा संशय हवालदार घोळवे यांना आला. त्यातून हवालदार घोळवे यांनी विनोद सखाराम जाधव यास पकडण्याचा प्रयत्न केला. दोघांतील झटापटीत हवालदार घोळवेच्या हातातील काठी खाली पडली. संधीचा फायदा घेत जाधवने काठी उचलून घोळवे यांच्या डोक्यात मारली.
या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. सहकारी जखमी झालेला असतानाही सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय मोरे यांनी तत्परता दाखवत जाधवला पकडले. जखमी घोळवे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जामखेड पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दोन दिवसात दुसरा हल्ला
दोन दिवसांपूर्वी भाजपच्या माजी नगरसेवकाच्या भावावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पोलिसांवरच हल्ला झाल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पोलिसांवरच असे जीवघेणे हल्ले होत असतील तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचं काय?, या गुंडांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे? घटनात्मक पदांवर बसलेले नेते आता गप्प का? नगरपरिषद निवडणुकीत गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना पुरस्कृत केलं होतं का? वारंवार आवाज उठवूनही गृह विभागाला ही दहशत का मोडून काढता येत नाही? की जनतेचा संयम सुटण्याची वाट बघितली जातेय?
रोहित पवार, आमदार.