संगमनेर: संगमनेर मतदार संघात ९५०० बोगस मतदार आहेत. पहिल्या मतदार याद्या दुरुस्त करा, मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. (Latest Ahilyanagar News)
मुंबई येथे महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी संगमनेर मतदार संघातील मतदार यादीवरही भाष्य केले. याप्रसंगी व्यासपीठावर देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, किसान सभेचे अॅड अजित नवले आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडनुका या बोगस मतदार याद्यांवर झाल्या. आम्ही यावर हरकती घेतल्या. विधानसभेला वापरलेल्या निवडणुक याद्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये वापरू नका, अशी आम्ही मागणी केली. मात्र, या याद्यांच्या हरकतीवर कोणताही निर्णय न घेता त्यांनी एक जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाला ह्या याद्या दिल्या आहेत. माझ्या संगमनेर मतदार संघामध्ये ग्रामीण भागात १५०० बोगस मतदार नोंदणी आहे. शहरात ६०,००० मतदार आहेत. आम्ही हरकती घेतल्या. या मतदार याद्या दुरुस्त झाल्या पाहिजे. तेथे तहसीलदाराने आम्हाला हा दुरुस्तीचा अधिकार नाही, असे लेखी उत्तर दिले. विधानसभेची बोगस मतदार यादी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरली जाईल.
निवडणूक आयोगाने पत्र काढले, दुरुस्त्या कराव्यात त्या अगोदर नगरपालिकेच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मागच्या विधानसभेच्या मतदार यादीत प्रचंड घोळ आहे. बोगस मते नोंदविण्यात आली आहे. पहिली मतदार यादी दुरुस्त झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, मतदार याद्या दुरुस्त करा आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्या, अशी मागणी केली.