उत्तर महाराष्ट्र

Accident : पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात पाच ठार; महिलांच्या घोळक्यात शिरली चारचाकी

backup backup

राजगुरूनगर(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : पुणे- नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली परिसरात खरपुडी फाट्यावर सोमवारी (दि. १३) रात्री ११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. केटरिंग कामासाठी पुण्याहून आलेल्या महिलांना रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात ५ महिलांचा चिरडून मृत्यु झाला. तर तीन महिला अत्यवस्थ स्थितीत आहेत.

खरपुडी रस्त्यावर असलेल्या एका कार्यालयात मंगळवारी असलेल्या लग्नाच्या कार्यक्रमात जेवण बनवून वाढपी काम करण्यासाठी १७ महिला पीएम पीएल बसने आल्या होत्या. सर्व महिला रस्ता ओलांडत असताना पुण्याच्या बाजूने वेगात आलेल्या महिंद्रा एक्स यु व्ही जीपने १७ महिलांच्या घोळक्यातील ८ महिलांना जोरदार धडक दिली. यात चार ते पाच महिला वाहनाच्या धडकेत रस्त्यावर पडुन अक्षरशः चिरडल्या गेल्या. त्यातील दोन जागीच ठार झाल्या. एका महिलेचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी पहाटे एकीचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला.

शोभा राहुल गायकवाड, सुनंदा सटवा गजेशी (वय ६२, रा. कात्रज), सुशीला वामन देढे (वय ७०, रा. रामटेकडी), इंदुबाई कोंडीबा कांबळे (वय ४७, रा. किरकटवाडी), राईबाई पिरप्पा वाघमारे (वय ५५,रा रामटेकडी) पुणे असे अपघातात मृत्यु झालेल्या महिलांची नावे आहेत. यातील तीन महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित महिलांना गंभीर दुखापत झाली आहे.अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी दिली.

अपघात स्थळापासून जवळच असलेल्या कार्यालयात वाढपी काम करण्यासाठी या महिला पुण्यातील स्वारगेट, खडकवासला , किरकटवाडी,रामटेकडी परीसरातून आल्या होत्या. पुण्याच्या बाजूने बसमधून आल्यावर खरपुडी फाटा येथे या सर्वजणी उतरल्या. पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे महामार्गावरून त्या घोळक्याने जात होत्या. याच वेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला.पुणे बाजूकडून आलेल्या वेगात वाहनाने या सर्वांना जोरदार धडक दिली. यात पाच महिला ठार झाल्या. अपघात झाल्यावर धडक देणारी जीप दुभाजकाला धडकली.

घाबरलेल्या चालकाने ती दुभाजकावरून फिरवुन पुन्हा दुसऱ्या बाजूने पुण्याच्या दिशेने धूम ठोकली. पोलिसांनी या वाहनाचा शोध घेतला. मात्र अद्याप तपास लागला नसल्याचे भोसले यांनी सांगितले. सारिका देवकर, वैशाली लक्ष्मण तोत्रे व शोभा सुभाष शिंदे अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.

पोलिसांची तातडीने भूमिका
रात्रीच्या अंधारात घडलेला अपघात भीषण होता. रस्त्यावर रक्तबंबाळ व छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडलेल्या महिलाबरोबरच्या महिलांचा मदतीसाठी आक्रोश यामुळे पाहणाऱ्या व्यक्तीला धडकी भरत होती. याचवेळी राजगुरूनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले येथुन पुण्याकडे निघाले होते. त्यांनी थांबुन तातडीने मदत कार्य सुरू केले.

उपाययोजना करण्याची गरज
पुण्याकडून येणाऱ्या वाहनांचा वेग नेहमीच जास्त असतो. येथील फाट्यावरून शिरोलीच्या काही वस्त्या तसेच खरपुडी गाव व खंडोबा देवस्थानकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच महामार्गाजवळ तीन ते चार मंगल कार्यालय आहेत. अनेकदा अपघात घडतात. कालच्या भीषण अपघाताची महामार्ग प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

तीव्र उतारामुळे पुण्याकडून वेगात येणारे वाहन नियंत्रित होत नाही. म्हणून उतार सुरू होण्याआधी २०० मीटर वर पांढरे पट्टे, नंतर १०० मीटरवर स्ट्रम्बलिंग स्ट्रिप्स व उताराआधी १ मीटर वर स्पीड ब्रेकर बसवणे आवश्यक आहे.

                                         -अविनाश गावडे, प्रवासी, राजगुरूनगर

कोणतेही वाहन नसल्याचे खात्री करून आम्ही सर्वजणी रस्ता ओलांडत होतो. धडक देणारे वाहन आमच्यापर्यंत कधी आले आम्हाला कळले पण नाही. काही गाडीखाली तर काही जणी हवेत उडाल्याचे आम्ही पाहिले. काही क्षणात आमच्या सहकारी जगाचा निरोप घेऊन गेल्या. हातावर पोट असलेल्या महिलांना आम्ही काम देतो. कुटुंबाचा प्रमुख असलेल्या सर्वजणी आहेत. पण असा दुर्दैवी प्रसंग या कुटुंबात अंधार पडायला कारणीभूत ठरेल असे वाटले नव्हते.

                                       – शिवानी कैलास माने, केटरिंग महिलांच्या ठेकेदार

हेही वाचा

SCROLL FOR NEXT