पुणे: एक हजार विद्यार्थ्यांनी पूर्ण केला रिसर्च अँड पब्लिकेशन अभ्यासक्रम | पुढारी

पुणे: एक हजार विद्यार्थ्यांनी पूर्ण केला रिसर्च अँड पब्लिकेशन अभ्यासक्रम

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रवेश घेतलेल्या एक हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाने अनिवार्य केलेला रिसर्च अँड पब्लिकेशन एथिक्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला.

हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स या केंद्राने डिझाइन केला आहे. या अभ्यासक्रमात तत्त्वज्ञानाचे स्वरूप, त्यातील विविध शाखा, त्यांचा संशोधनाशी संबंध, जगभरातील संशोधनाची मानके, वाङ्मयचौर्य, बनावट प्रकाशने आणि नियतकालिके ओळखण्यासाठीची साधने, तंत्रे इत्यादी बाबींचा समावेश आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचे उद्घाटन केले. त्यानंतर भारतभरातील विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम अभ्यासला जात आहे.

15 जून 2021 पासून या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत सात बॅच पूर्ण झाल्याची माहिती सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्सच्या प्रमुख डॉ. शुभदा नगरकर यांनी दिली. यादरम्यान विद्यापीठ तसेच अनेक नामांकित संस्थांमधील तज्ज्ञ व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. दीपक माने आदींचे सहकार्य मिळाल्याचेही डॉ. नगरकर यांनी सांगितले.

Back to top button