पुणे: जानेवारीमध्ये साडेनऊ कोटींच्या वीजचोर्‍या पकडल्या | पुढारी

पुणे: जानेवारीमध्ये साडेनऊ कोटींच्या वीजचोर्‍या पकडल्या

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महावितरणच्या भरारी पथकाने जानेवारीत जुन्नर व उरुळी कांचन येथे धाड टाकून चार कोटी 98 लाख रुपयांच्या 150 वीजचोरींच्या घटना उघडकीस आणल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. तसेच, इतर अनियमिततेच्या 98 प्रकरणांत चार कोटी 60 लाखांची बिले देण्यात आलेली आहेत. उघडकीस आलेल्या चोरीमध्ये तीन मोठ्या चोर्‍या असून, यात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. या ग्राहकांविरुध्द फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण भागातील जुन्नर परिसरात भरारी पथकाने धाड टाकून स्टोन क्रशर कंपनीची वीजचोरी उघडकीस आणलेली आहे. या औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून दोन लाख 19 हजार 687 युनिटची वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले असून, त्याला 46 लाख 63 हजार रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले आहे. दुसर्‍या प्रकरणात पुणे ग्रामीण भागातील उरुळी कांचन परिसरात भरारी पथकाने धाड टाकून स्टोन क्रशर कंपनीची वीजचोरी उघडकीस आणली आहे. सदर औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून दोन लाख 75 हजार 782 युनिटची चोरी केल्याचे आढळून आले आहे. त्यांना 48 लाख रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले आहे. तसेच, तिसर्‍या प्रकरणात उरुळी कांचन परिसरात भरारी पथकाने धाड टाकून आणखी एका स्टोन क्रशर कंपनीची वीजचोरी उघडकीस आणलेली आहे. सदर औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून दोन लाख 5 हजार 38 युनिटची चोरी केल्याचे आढळून आले आहे. त्याला 36 लाख 96 हजार रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मोठ्या प्रमाणात वीजचोरी शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे व पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक सुमीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वीजचोरीविरुद्ध भरारी पथक मोहिमा राबवीत आहोत.

Back to top button