मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : वाढत्या गुन्हेगारीमुळे सक्रीय झालेल्या तपास यंत्रणांना गुरुवारी (दि.24) मोठे यश मिळाले. कट्टे विक्रीसाठी शहरात नगर जिल्ह्यातून आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि छावणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून स्विफ्ट कार, तीन गावठी कट्टे आणि 12 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत.
शहरातील सामान्य रुग्णालयाजवळील मोसम नदी किनारी गुरुवारी दुपारी ही कारवाई झाली. एमएच 02 बीजी 3598 या कारमधून आलेल्या दोन संशयितांची पोलिसांना माहिती मिळाली. तत्काळ पथक आणि छावणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. माहितीप्रमाणे संबंधित कार रोखण्यात आली. त्यात दोन संशयित होते. त्यांची विचारणा केली असता संशय बळावला. कारची तपासणी करण्यात आली असता तीन कट्टे आणि 12 जीवंत काडतूस मिळून आलेत. त्यांना छावणी पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून, चौकशी सुरु आहे.
दरम्यान, त्या दोघांपैकी एकावर खूनाचा गुन्हा दाखल असून, दुसरादेखील सराईत गुन्हेगार आहे. श्रीरामपूर आदी भागात त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील गुन्हेगारी विश्वात गावठी कट्टे वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात या कारवाईमुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.