मुंबई

सत्तेच्या दुरुपयोगाने राजकारण नासले

Shambhuraj Pachindre

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

प्रामाणिकपणे लोकांसमोर जाऊन लोकांनी सत्ता दिली, तर तुम्ही राज्य करा. लोकशाही मार्गाने सत्तेवर या; पण सगळे मलाच हवे आणि सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवीनच, हा प्रकार देशाच्या राजकारणात यापूर्वी कधी नव्हता. अशा प्रवृत्तीने देशाचे राजकारण नासवून टाकले आहे. विकृत करून टाकले आहे. त्यातूनच आज देशात राज्य आणि केंद्रामध्ये संघर्ष सुरू झाला आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली.

मुंबईत एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, केंद्रात बसलोय म्हणून राज्याची मुस्कटदाबी करायची या प्रवृत्तीचा सगळ्यांनी निषेध करायला हवा. सत्ता कुणाला नको असते? रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आपल्या लोकशाहीवरही सतत आक्रमण सुरू आहे. गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. आपल्याकडे चिमूटभर सापडले तर केवढा गहजब केला जातो.

महाराष्ट्रात जणू काही तुळशी वृंदावनाची संस्कृती सोडून गांजाची शेती होतेय, असे चित्र उभे करायचे आणि महाराष्ट्राला बदनाम करायचे हे षड्यंत्र सुरू आहे. धाडीमागून धाडी सुरू आहेत, असा संताप व्यक्त करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येकाचे दिवस असतात आणि दिवस बदलतात!

उद्धव ठाकरे यांना पुन्हा युती शक्य आहे का, याबाबत विचारले असता ते म्हणाले, आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता लक्षात आले आहे की, ज्या हेतूने आम्ही युती केली होती, तो हेतू बाजूला पडला आहे. फक्त वाट्टेल त्या पद्धतीने सत्ता मिळाली पाहिजे यासाठी हिंदुत्वाचा देखील वापर होत आहे. ते ज्या पद्धतीने चालले आहेत, ते सुधारणार आहेत का?

तुम्हाला लोकांची कामे करण्यासाठी सत्ता दिली आहे. एकमेकांवर चिखलफेक करायची, बदनाम करायचे आणि आम्ही कसे गंगास्नान करून पवित्र आहोत हे दाखवण्याचे जे गलिच्छ प्रकार सुरू झाले आहेत, हे सुदृढ लोकशाहीसाठी हानीकारक आहे, असेही उद्धव म्हणाले. राज्यात कोरोना काळात केलेल्या कामाचे सर्वोच्च न्यायालयाने देखील कौतुक केले आहे. आता त्यातही भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. हे दुर्दैवी असल्याचे सांगत 'शोधा काय शोधायचे ते' असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की, तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो. आता देशही तुम्ही जिंकलात, राज्यही तुम्हाला आणि महापालिकाही तुम्हालाच पाहिजे, पंचायती आणि सोसायट्याही तुम्हालाच हव्यात. मग आम्ही धुणीभांडी करायची का? आम्हालाच सगळं पाहिजे या प्रवृत्तीतून राजकारण भाजपने नासवून टाकले, असे उद्धव म्हणाले.

पुन्हा मंत्रालयात येणार

मधला कोरोनाचा काळ आव्हानात्मक होता. काही काळ मंत्रालयही बंद ठेवावे लागलं होते. पुढच्या आठवड्यात अधिवेशन सुरू होत आहे. ते झाल्यावर पुन्हा मंत्रालयात काम सुरू करणार आहे आणि अधिवेशनातही येणार असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, अनेकांचा मी पुन्हा येईन यावर विश्वास नव्हता. पहिल्या वर्षी आल्यानंतर पुढच्या वर्षी येईन असे वाटले नव्हते. पुन्हा येईन असे बोलून न येणे यापेक्षा हे बरे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT