कोल्हापूर : चंद्रशेखर माताडे
नगरपालिकांच्या निवडणुकांत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या निवडणुकांत स्थानिक विकास आघाड्यांचाच बोलबाला असला, तरी त्याआडून नेते आपल्या सोयीचे किंवा कार्यकर्त्यांच्या सोयीने राजकारण करतात. त्यामुळे नेत्यांचा सहभाग व त्याआडून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागते.
इचलकरंजी नगरपालिकेत भाजपकडे नगराध्यक्षपद होते. तर सभागृहात संमिश्र सत्ता होती. आता तेथे चुरशीचा सामना आहे. आ. प्रकाश आवाडे यांचा ताराराणी पक्ष आहे. ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. भाजपचे तत्कालीन आ. सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून ते निवडून आले. तेथे भाजपमध्येच जुना-नवा असा वाद आहे. या निवडणुकीत आ. आवाडे कोणती भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांचे समर्थक भाजपच्या चिन्हावर लढणार की मूळ भाजपवाले त्यांना बाजूला ठेवणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
इचलकरंजीत राहुल खंजिरे, शशांक बावचकर व संजय कांबळे हे काँग्रेसचे नेते आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना यांचीही ताकद आहे. खा. धैर्यशील माने शिवसेनेचे आहेत. तेथेही शिवसेनेत वाद आहेत. त्याचबरोबर आता आवाडे यांच्यापासून दूर गेलेले विलास गाताडे, अजित जाधव, सागर चाळके, अशोक स्वामी, हिंदुराव शेळके, राजाराम धारवट हे त्यांच्या त्यांच्या पक्षांच्या भूमिकेत असले, तरी शेवटी पडद्याआडच्या घडामोडींत त्यांचे स्थान महत्त्वाचे असेल.
जयसिंगपूर येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याविरोधात स्थानिक नेत्यांनी पक्षभेद विसरून आघाडी करण्याचे ठरविले आहे. तेथे यड्रावकर यांच्यासमोर आव्हान उभारण्याचा प्रयत्न सुरू असून, 'दत्त शिरोळ'चे प्रमुख गणपतराव पाटील हेही त्यांच्याविरोधात असतील. माजी आ. उल्हास पाटील, अनिल यादव व स्थानिक नेते स्थानिक विकास आघाडीचे नेतृत्व करतील. स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचीही ताकद यामागे असेल. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे उट्टे काढण्याचा पाटील यांचा प्रयत्न असेल.
कुरूंदवाड येथे जयराम पाटील यांच्याविरोधात आघाडी करण्याचा प्रयत्न आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर, रामचंद्र डांगे, जवाहर पाटील यांच्याशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे.
पन्हाळा येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे यांची सत्ता होती. तेथे स्थानिक विकास आघाडी त्यांच्याविरोधात होती. मात्र, आता विरोधातील ताकद किती प्रमाणात वाढेल, यावरच कोरे यांचे बळ कमी होणार का? हे ठरणार आहे.
मलकापूर येथे भाजप व जनसुराज्य शक्ती यांची सत्ता होती. तर विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रेस असे समीकरण होते. विनय कोरे व सर्जेराव पाटील विरुद्ध मानसिंगराव गायकवाड व सत्यजित पाटील-सरूडकर असा सामना होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बँकेतील विजयाने विरोधी गटाला राजकीय ताकद मिळाली आहे. त्याचा ते कसा उपयोग करून घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलमध्ये चुरशीचा सामना असेल. तेथे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्याबरोबरच सामना करावा लागणार आहे. तेथे शिवसेनेचे खा. संजय मंडलिक कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते मुश्रीफ यांच्यापासून लांब गेले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. मुरगूड नगरपालिकेत संजय मंडलिक कोणाशी युती करणार, ते महत्त्वाचे आहे. कागल व मुरगूडमध्ये संजय मंडलिक हे स्वतंत्र लढतील किंवा हसन मुश्रीफ वा समरजितसिंह घाटगे यांच्याशी आघाडी करतील. त्यामुळे त्यांचा निर्णय महत्त्वाचा असणार आहे. 'गोकुळ'मधील बहिणीच्या व मुलाच्या पराभवाची सल मनात असल्याने ते मुश्रीफ यांच्याविरोधात जाण्याची जास्त शक्यता आहे.
वडगाव नगरपालिकेत यादव गट विरुद्ध सालपे गटात वर वर दिसणारा संघर्ष असला, तरी या स्थानिक आघाड्यांच्या मागून विनय कोरे, राजूबाबा आवळे, महादेवराव महाडिक, राजू शेट्टी यांचे कधी छुपे, तर कधी उघड समर्थन असते हे लपून राहिलेले नाही.
गडहिंग्लज नगरपालिकेत जनता दलाचे माजी आ. श्रीपतराव शिंदे यांची सत्ता होती. तेथे स्थानिक आमदार म्हणून हसन मुश्रीफ यांचे समर्थक राष्ट्रवादीचे सदस्य असले, तरी ते विरोधात होते. आता जनता दलविरुद्ध राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना अशी महाविकास आघाडी रिंगणात असेल. तसे झाले तर भाजप जनता दलाला आपले समर्थन देईल. त्याचवेळी 'गोडसाखर'च्या राजकारणाचा प्रभावही गडहिंग्लज शहरावर आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध मुश्रीफ सामना रंगणार आहे, असे सध्याचे चित्र आहे.
यापूर्वी झालेल्या 'गोकुळ' तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणाला शब्द दिला, कोणाचा पराभव झाला, या सगळ्या हिशेबाची मांडणी आता केली जात आहे. विशेषतः, खासदार संजय मंडलिक यांना 'गोकुळ'मध्ये, गणपतराव पाटील यांना जिल्हा बँकेत फटका बसला आहे. तर मानसिंग गायकवाड व सत्यजित पाटील-सरूडकर यांना जिल्हा बँकेत विजयाचा गुलाल लागला. या सार्या यशापयशाचा हिशेब नगरपालिका निवडणुकांत चुकता करण्याची तयारी नेत्यांनी केली आहे.