क्रीडा ग्रेस गुणांसाठी अट शिथिल! | पुढारी

क्रीडा ग्रेस गुणांसाठी अट शिथिल!

कोल्हापूर : प्रवीण मस्के

कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षांपासून शालेयस्तरावर क्रीडा झाल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीसाठी क्रीडा ग्रेस गुण अट शिथिल करण्यात आली आहे. दहावीसाठी 7 वी-8 वीचे, तर बारावीला 9 वी-10 वीच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धार्ंतील सहभाग, प्रावीण्यानुसार गुणांची सवलत मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 वीच्या वर्गात असताना विविध क्रीडा स्पर्धार्ंतील सहभाग व प्रावीण्यानुसार क्रीडा गुण दिले जातात. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे शालेय क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे क्रीडा गुण सवलत मिळेल की नाही, याबाबत खेळाडू हवालदिल झाले होते. क्रीडा सहभागाची अट शिथिल करावी, अशी मागणी राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाने केली होती. त्या पार्श्वभूमीवर कोव्हिड-19 साथीच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत 2021-22 या वर्षात क्रीडा गुण सवलतीचा निर्णय क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने घेतला आहे.

शालेय शासकीय स्पर्धा (विभाग) – जिल्हास्तरीय स्पर्धेतील 1 ते 3 क्रमांक प्रावीण्य -5 गुण, विभागीय स्पर्धा प्रावीण्य-10 गुण, राज्यस्तर सहभाग-12 गुण, राज्यस्तर प्रावीण्य-15 गुण, राष्ट्रीयस्तर स्पर्धा प्रावीण्य-20 गुण, आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रावीण्य-25 गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. याशिवाय विविध खेळांच्या असोसिएशन व फेडरेशनमार्फत खेळलेल्या खेळाडूंनाही ग्रेस गुणांची सवलत मिळू शकते.

दहावी, बारावीसाठी क्रीडा ग्रेस गुण सवलतीचे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे प्रस्ताव येत असून, 5 एप्रिलपर्यंत मुदत आहे. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून अर्ज विभागीय मंडळाकडे पाठविण्यात येतील. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

– डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी

Back to top button