मुंबई

मुंबई : शरद पवारांच्या घरावरील हल्‍ल्‍याचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध

निलेश पोतदार

मुंबई ; पुढारी ऑनलाईन एसटी कर्मचाऱ्यांनी आज (शुक्रवार) अचानकपणे मुंबईतील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक करत आंदोलन केल्‍याची घटना घडली. या घटनेचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध करत, ही घटना समर्थनीय नसल्‍याचे म्‍हटले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली ही घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजिबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो अशी भूमिका त्‍यांनी मांडली.

गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षाही या निमित्ताने त्‍यांनी व्यक्त केली.

दरम्‍यान या घटनेनंतर राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्तेंनी निषेध केला असून, राष्‍ट्रवादीच्या नेत्‍यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या तासभराच्या नाट्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना नेतृत्वाला दोष दिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या नाही असे पवार म्हणाले. नेता चुकीचा असला, की काय होत ते आज दिसून आलं. कारण नसताना एसटी कर्मचारी नोकरीपासून बाजूला राहिला. चुकीचा मार्ग कोण दाखवत असेल तर विरोध करण सर्वाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर शुक्रवारी करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात 107 जणांविरोधात कट रचून दंगल घडवून आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एसटीतील कर्माचार्‍यांसह अन्य आंदोलनकर्ते आरोपी आणि 23 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी प्रसीद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात सदावर्ते यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT