डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीत मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी पुन्हा रेल्वे स्थानकावरील फेरीवाल्यांचा प्रश्न हाती घेतला आहे. यावेळी त्यांनी प्रशासन आणि सरकारला सर्वोच्च नायायालयाचे निर्णय ऐकायचे नाहीत, असे दिसून येत असल्याचा आरोप सरकारवर केला.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली नाहीतर, आयुक्तांना कल्याण डोंबिवलीत राहू देणार नाही, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे मनसेतर्फे डोंबिवली शहरात फेरीवाल्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा खळखट्याक होण्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
डोंबिवली शहरात अनेक वेळा फेरीवाला क्षेत्र ठरवण्यासाठी सर्व्हे करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर अंतरावर फेरीवाले बसू नयेत, असे सांगितले होते. मात्र, डोंबिवली रेल्वे स्थानकात हा नियम धाब्यावर बसवून रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी १५० मीटर मध्येच आपले बस्तान बसवल्याचे दिसून आले. या फेरीवाल्यांमुळे रेल्वेस्थानक परिसर बकाल झाला असून येथे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे महापालिका अधिकारी मात्र, दुर्लक्ष करत असून हे अधिकारी फेरीवाल्यांकडून वसुली करतात, असा आरोप घरत यांनी केला. त्यामुळे लवकरात लवकर जर कारवाई केली नाहीतर आम्ही आयुक्तांना कल्याण-डोंबिवलीत राहू देणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे.
हेही वाचलंत का ?