मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आरोग्याची काळजी, सुदृढ राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि सायकलिंगचे महत्व पटवून देण्यासाठी शतक महोत्सवी वर्षानिमित्त नायर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी शंभर किलोमीटरचा सायकलिंग करून जनजागृती केली. नायर रुग्णालय – गेटवे ऑफ इंडिया – दहिसर ते नायर रुग्णालय अशा मार्गावर हे सायकलिंग करण्यात आले.
ब्रिटिश कालीन 4 सप्टेंबर 1921 रोजी स्थापन झालेल्या नायर रुग्णालयाला 4 सप्टेंबर 2021 रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. सर्वसामान्य रुग्णांची अविरत सेवा करता करता कोरोना महामारी च्या या संकटात सुद्धा नायर रुग्णालयाने संपूर्ण रुग्णालय कोरोना सेंटर बनवून रुग्णांना उत्तम प्रकारे सेवा दिली आहे.
या शतक उत्सवाचा भाग म्हणून या नायर रुग्ण मंदिराने अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. त्याचाच भाग म्हणून 5 सप्टेंबर रोजी नायर वासियांनी शंभर किलोमीटरचा सायकलिंग कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. यामध्ये डॉक्टर्स, विद्यार्थी, कर्मचारी यांनी उत्साहपूर्वक भाग घेतला. सायकलींगच्या या कार्यक्रमाला नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. धारप, उप अधिष्ठाता डॉ. राणा आणि चिफ कोऑर्डिनेटर डॉ. कुमार दुस्सा यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले.
या शंभर किलोमीटर सायकलिंग मध्ये नायरचे 17 सायकल स्वार सहभागी झाले होते. मुंबई शहरातील नायर रुग्णालय – गेटवे ऑफ इंडिया – दहिसर ते परत नायर रुग्णालय अशा सायकलच्या या 100 किलोमीटरच्या मार्गावर मुंबई पोलिसांचे खूप मोठे सहकार्य लाभले. शारीरिक तंदुरुस्ती साठी सायकलिंग चे महत्व पटवून देत तसेच कोरोना महामारी मध्ये नागरिकांना मास्क वापरण्याचा व लस घेण्याचा संदेश देत हा उपक्रम यशस्वी रित्या पार पडला.डॉ. कुमार दुस्सा सांगतात.