Zilla Parishad election results Pudhari
मुंबई

Zilla Parishad election results: जिल्हा परिषद–पंचायत समिती निकालांत राजकीय धक्के; नेत्यांच्या नातेवाईकांचा पराभव अन्‌‍ विजयाची सरमिसळ

कुणाची कन्या, कुणाची वहिनी पराभूत; तर आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबीयांनी मिळवले यश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अनेक ठिकाणी बड्या नेत्यांना, नेत्यांच्या नातेवाईक व कुटुंबीयांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. सोलापूर, परभणी, सातारा, सांगली, लातूरसह विविध जिल्ह्यातील आमदार, खासदार व नेतेमंडळींच्या नातेवाईकांना पराभव स्वीकारावा लागला. तर अनेक ठिकाणी मोठ्या नेत्यांच्या नातेवाईकांनी आपापल्या गट-गणातून विजय मिळवल्याचे चित्र आहे.

मंत्री जयकुमार गोरेंना साताऱ्यात धक्का

भाजप नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत दोन धक्के बसले. त्यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकुडवाड गटात पराभव झाला. येथे राष्ट्रवादीचे अनिल देसाई विजयी झाले. तर औंध गटातही त्यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांचा 40 मतांनी पराभव झाला. येथेही राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरे विजयी झाल्या आहेत.

माजी आमदारांच्या भावजय पराभूत

भाजप नेते तथा माजी आमदार त्र्यंबक भिसे यांनाही मोठा धक्का बसला असून, लातूर जिल्ह्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या आशाताई भिसे यांचा विजय झाला आहे. येथे भाजपच्या सरिता भिसे यांचा पराभव झाला असून, सरिता भिसे माजी त्रिंबक भिसे यांच्या भावजय आहेत. माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नीचा पराभव झाला असून, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या मृणाल महेश पाटील यांनी त्यांचा पराभव केला. लातूर जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कन्येला पराभव पत्कारावा लागला आहे. सुप्रिया शृंगारे पायाळ यांचा पराभव झाला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा कांबळे विजयी झाल्या आहेत.

मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पराभूत

मोहोळमध्ये कुरुल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील स्वतः उमेदवार असून ते पराभूत झाले आहेत. तर, नरखेड जिल्हा परिषद गटातून उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांचा पराभव झाला आहे.

संभाजीनगरातील अपक्षाचा एका मताने विजय

संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटातील भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांना एक मताने विजय मिळाला. शिंदे गटाचे हनुमंत भोंडवे यांचा त्यांनी पराभव केला. एक मताने निवडून आलेल्या गरड यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. वाळू माफियांच्या आणि ताकदवार उमेदवारांच्या विरोधात लढलो, जनतेने मी सामान्य असतानाही निवडून दिले, त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया गरड यांनी विजयानंतर दिली.

नेत्यांचे हे नातेवाईक झाले विजयी

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सूरज पाटील यांचाही पंचायत समिती निवडणुकीत विजय झाला आहे.

सांगली जिल्ह्यात रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांच्या सूनबाई मोहिनी खोत बागणी जिल्हा परिषदेतून विजयी झाल्या आहेत.

आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल आमेर अंभई गटातून जवळपास 3435 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

सांगलीच्या निंबवडे गटात भाजपच्या उमेदवार माधवी पडळकर विजयी झाल्या आहेत. माधवी या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आहेत.

सोलापूर जिल्ह्यात सांगोला पंचायत समितीवर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सुनबाई विजयी झाल्या आहे.

अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गटातून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी विजयी झाल्या आहेत.

चपळगाव पंचायत गणातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी विजयी झाले आहेत.

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कन्या शीतल सिद्धाराम म्हेत्रे विजयी झाल्या आहेत. तसेच त्यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे हेही विजयी झाले आहेत.

उत्तर सोलापूरच्या कोंडी गटातून माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र डॉ. पृथ्वीराज दिलीप माने विजयी झाले आहेत.

बीबी दारफळ जिल्हा परिषद गटातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित पवार विजयी झाले.

दक्षिण सोलापूरच्या हत्तूर जिल्हा परिषद गटातून माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या पत्नी लक्ष्मी रतिकांत पाटील विजयी झाल्या आहेत.

धाराशिवच्या परंड्यातील शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी विजयी झाली आहे. आलूर पंचायत समिती गणातून 3925 मतांनी आकांक्षा चौगुले यांचा विजय झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT