Wilson Gymkhana Protest Pudhari
मुंबई

Wilson Gymkhana Protest: विल्सन जिमखाना आमच्या हक्काचा! जिओ संस्थेला हस्तांतरणाविरोधात आझाद मैदानात तीव्र मोर्चा

115 वर्षांची परंपरा धोक्यात; ख्रिश्चन समाज, गिरगावकर आणि आजी-माजी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात संताप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : 115 वर्षांपासून विल्सन महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेला गिरगाव चौपाटीवरचा विल्सन जिमखाना परस्पर जैन समाज संचलित जिओ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या हवाली करण्यात आल्याने राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराज झालेली ख्रिश्चन मंडळी, आजी-माजी विद्यार्थी, खेळाडू तसेच गिरगावकर मंडळीनी सोमवारी आझाद मैदानावर मोर्चा काढला. विल्सन जिमखाना आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, अशा घोषणा देत हा जिमखाना पुन्हा ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

विल्सन जिमखान्यावर विल्सनच्या विद्यार्थ्यांसह गिरगाव परिसरातील खेळाडू येत. इथे कोणालाही खेळताना कधी अडवणूक करण्यात आली नाही. जिमखाना खेळायला सर्वांनाच मोफत होता. असे असताना शासनाने सदर जिमखाना जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनकडे अनधिकृतपणे हस्तांतरित केल्याचा आरोप जॉन विल्सन सोसायटीचे सचिव लालबहादूर कांबळे यांनी केला. या प्रकरणी याचिका कोर्टात दाखल असताना पोलिसांनी, बाऊन्सरच्या मदतीने जिमखान्याचा बळजबरीने ताबा घेतल्याचे कांबळे म्हणाले.

या प्रकरणी सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने ती मंगळवारी होईल, असे समाजसेवक व प्रसिद्ध वकील सिरिल दारा यांनी सांगितले.

जिओ संस्थेचा खेळाशी काही एक संबंध नसताना विल्सन जिमखाना शासनाने परस्पर जिओ संस्थेला दिलेला आहे. त्याचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. सरकार ख्रिश्चन समाजाच्या का मागे लागले आहे? या समाजाने महाराष्ट्रासाठी, देशासाठी. शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे. या महाराष्ट्राच्या मातीत आमची जडणघडण झालेली आहे, याचीही आठवण राज्य सरकारला यावेळी करून देण्यात आली.

सुरुवातीला जैन लोक मुंबईत पाहुणे म्हणून आले. आधी इकडच्या रस्त्यावरची त्यांनी नावे बदलून स्वतःची नावे द्यायला त्यांनी सुरुवात केली. मग मराठी लोकांच्या चाळी गिळू लागले. आता स्टेशनची नावे बदलू लागले आहेत.

या समाजाचा महाराष्ट्राच्या जडण घडणीशी संबंध काय आहे असा प्रश्न ‌‘आम्ही गिरगावकर‌’ संघटनेचे सचिव मिलिंद वेदपाठक यांनी केला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या आंदोलनत उतरणार असल्याची माहिती दिली आहे पण ते दिल्लीला आहेत.पुढच्या आंदोलनात स्वतः उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघे बंधू देखील उतरणार असल्याचे वेदपाठक यांनी सांगितले.

आम्ही विल्सन कॉलेजसोबत खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरणार कारण विल्सन जिमखाना आमच्या हक्काचा आहे, असे वेदपाठक यांनी सांगताच, अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही अशा घोषणा देत आंदोलकांनी आझाद मैदान दणाणून सोडले.

विल्सन जिमखान्याचा भूखंड हस्तांतरित करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी यावेळी करण्यात आली. सहाय्यक अधीक्षक निरीक्षक नगर भूमापन अधिकारी प्रदीप तावरे आणि किशोर ढोकळे परिरक्षण भूमापक मुंबई नगर भूमापन व भूमी अभिलेखा (शहर) अशी त्यांची नावे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT