

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रवादी अजित पवारांसोबतच्या बैठकीत झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळत शरद पवार गटाच्या नेत्यांना फटकारले होते. मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर शरद पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. जे विलीनीकरणाच्या चर्चेतच नव्हते, त्यांना आमच्या बैठकीबाबत काय माहिती असणार, असा पलटवार पवार यांनी केला आहे. यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजपसोबत यायची तयारी असेल तरच निर्णय घ्या असे म्हटले आहे. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपला विचारावे लागेल, असा सूर मंत्री छगन भुजबळ यांनी लावला आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रचंड वादंग सुरू आहे. 17 जानेवारी रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या घरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाली होती. या चर्चेत 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा करण्याचा निर्णय झाला होता, असा दावा शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, राजेश टोपे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आदी नेते करीत आहेत. हा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अन्य नेत्यांनीही फेटाळून लावला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका स्पष्ट करताना शरद पवार गटाचा दावा फेटाळून लावला.
दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार असते तर अजित पवार यांनी मला सांगितले असते, ते माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करायचे, असे फडणवीस यांनी सांगतानाच काहीजण आपले हित न साधले गेल्याने संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्न करीत असल्याचे सांगत त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना फटकारले होते.
शरद पवारांनी फडणवीस यांच्या टीकेला एका वाक्यात प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, विलीनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी हे वक्तव्य केले असतानाच भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असती तर अजित पवारांनी मला सांगितले असते, असे फडणवीस म्हणाले आहेत, याकडे लक्ष वेधले.
दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र यावेत, अशी अनेकांची इच्छा आहे. ठाकरे एकत्र आले, मग पवारही यावेत. परंतु अशा काही चर्चा झाल्या की नाही याची कल्पना आम्हाला नाही. मुख्यमत्र्यांनीही सांगितले की, त्यांच्याशी अजित पवारांनी यासंदर्भात त्यांना काहीही सांगितले नव्हते. तसेच आम्हालाही याची कल्पना नाही. हे सर्व करायचे म्हणजे भाजपबरोबर राहून करायचे आहे. त्यामुळे त्यांना विचारले पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले.