मुंबई : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी व विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह मच्छीमार बांधव आझाद मैदानात एकवटले होते. यावेळी वाढवण बंदर प्रकल्प कायमस्वरुपी रद्द झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच महायुतीतील भाजपसह शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (सुनेत्रा पवार गट) या घटक पक्षांच्या उमेदवारांना कोणत्याही निवडणूकीत मतदान करु, नये असे आवाहन करण्यात आले.
पालघर जिल्हयात वाढवण बंदर करण्याचा सरकारचा प्रस्तावित प्रकल्प आहे. याला स्थानिक मच्छिमारसह समुद्रकिनाऱ्यावरील मच्छिमार, शेतकरी यांचा विरोध आहे. याठिकाणी बंदर झाले तर निसर्गाची हानी होणार आहे. तसेच मच्छिमारांना आपल्या घरातून, जमिनीतून हद्दपार व्हावे लागणार आहे. त्यामुळे वाढवण बंदरच्या या विनाशकारी प्रकल्पाला संघर्ष समितीचा विरोध आहे. प्रकल्पाला विरोध व मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी अधिवेशन काळात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु; पोलिसांनी मोर्चाला परवानगी न देता आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली.
यावेळी आंदोलनस्थळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘एकच जिद्द वाढवण बंदर रद्द’ ‘विनाशकारी विकास बंद करा, बंद करा’, ‘जिंदाल बंदर आणि विनाशकारी टेक्स्टाईल पार्क रद्द करा’, असे फलक यावेळी आणण्यात आले होते.
यावेळी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष नारायण पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढवण बंदरप्रश्नी व मच्छिमारांच्या मागण्यांसाठी भेट घेणार आहे. त्यांनीच यावर सकारात्क निर्णय घ्यावा.
आंदोलनात वैभव वझे, रामकृष्ण तांडेल, जयवंत तांडेल, वैभव भोइर, नारायण तांडेल, हेमंत तामोरे, देवेंद्र तांडेल, मोनालिसा तरे, प्रमोद आरेकर, जयेश गावड, उज्वला पाटील यांच्यासह मच्छिमारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, मच्छिमार, शेतकरी, बागायतदार, आदिवासी डाय मेकर्स बांधव, भूमिपुत्र यांचा सहभाग होता.
जिंदाल बंदर आणि विनाशकारी टेक्स्टाईल पार्क रद्द करा
समुद्रात होणारे विमानतळ आणि पर्यावरणास घातक चौथी मुंबई योजना तत्काळ थांबवा
मुंबईतील कोळीवाड्यांचे, बाजारांचे पुनर्विकास धोरण मच्छिमारांच्या हिताचे करा
ससून डॉक, मुंबई येथे बंद केलेली गोदामे त्वरित ताब्यात द्या
कफ-परेड,मुंबईतील प्रस्तावित भरीना पार्क प्रकल्प रद्द करा
छत्रपती शिवाजी महाराज बाजार (क्रॉफर्ड मार्केट) कोणत्याही स्थितीत स्थलांतरित करू नये
मुंबईतील सर्व बाजारांचा विकास करताना मच्छिमार महिलांना विश्वासात घ्या
मच्छिमारांची सर्व प्रकारची थकीत कर्जे शेतकऱ्यांप्रमाणे माफ करा
गोराईतील प्रस्तावित निक्षारीकरण प्रकल्प रद्द करा