मुंबई : राजन शेलार
राज्यात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याची गंभीर दखल राज्याच्या निवडणूक आयोगाने घेतली आहे. निवडणूक अर्ज भरताना विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर कोणी दबाव टाकला का, धमकी किंवा प्रलोभनांचा वापर झाला का, याची चौकशी केली जाणार असून यासंदर्भात संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त (निवडणूक प्रभारी) आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आले आहेत. हे अहवाल प्राप्त होईपर्यंत त्या प्रभागांतील बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचे निकाल जाहीर न करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी संपली. या प्रक्रियेनंतर राज्यभरात सत्ताधारी पक्षांचे 16 हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यात कल्याण-डोंबिवली, पनवेल, धुळे येथील भाजप उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी नगराध्यक्ष पदांच्या निवणुकीतही बिनविरोध उमेदवार निवडून येण्याचे मोठे प्रमाण होते.
सत्ताधारी पक्षांचेच उमदेवार बिनविरोध निवडून येणे हा निव्वळ योगायोग नसून त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच सत्ताधारी पक्षांकडून दबाव टाकून विरोधी उमेदवारांना उमेदवारी अर्जच दाखल करू दिले नाहीत, अशा तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध प्रक्रियेची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी दिली.
शुक्रवारी 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून 3 जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. ही यादी आल्यानंतर ज्या प्रभागातून उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्या प्रभागातून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त (निवडणूक प्रभारी) आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी कोणी जबरदस्ती केली का?, त्यांना कोणी प्रलोभन दाखवले काय?, अर्ज दाखल करण्यास कोणी विरोधी केला का?, किंवा अन्य कोणतेही दडपशाहीचे प्रकार झाले का?, त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरही इतरांचे अर्ज स्विकारू नये म्हणून दबाव आला होता काय?, आदी मुद्यांवर चौकशी करून संबंधितांकडून अहवाल मागवण्यात आल्याचे या सुत्रांचे म्हणणे आहे. हे अहवाल आयोगाला प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत संबंधित प्रभागांतील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची अधिकृत घोषणा करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचेही आयोगाच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे.
राज्यभरात सत्ताधारी पक्षांचे 16 हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची चर्चा आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपचे 5, तर शिवसेनेच्या 4 उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड, धुळे, पनवेल, भिवंडी, जळगाव आदी महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.