मुंबई : वित्तीय तूट, महसुलीत तूट, सबसिडी, प्रत्यक्षकर, अप्रत्यक्षकर अशा शब्दबंबाळ संज्ञांनी भरगच्च असलेला अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजूला सारली आणि आजच्या नव्या पिढीची म्हणेच मिलेनिअल्स आणि जेन झी तरुणाईशी संवाद साधणारा अर्थसंकल्प मांडला. त्यामुळेच क्रिएटिव्ह करिअर्स, स्वस्त आणि मस्त प्रवास, ए-आय, ग्लोबल लाईफस्टाईल आणि मानसिक आरोग्य तथा मेंटल हेल्थ हे विषय त्यांनी प्रथमच अर्थसंकल्पाच्या कक्षेत आणले. भारतीय तरुणाई कशी जगते, कशी काम करते, कसा विचार करते याचा अर्थसंकल्पाच्या धोरणातही विचार झाल्याने हा अर्थसंकल्प या पिढीला ‘बोर’वाटणार नाही.
मिलेनिअल्स आणि जेन झीने उभ्या केलेल्या ऑरेंज इकॉनॉमिला म्हणेच क्रिएटिव्ह इकॉनॉमीला या अर्थसंकल्पाने मान्यता दिली. यात ॲनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाईन, संगीत, चित्रपट, डिजिटल कंटेंट क्रिएशन थोडक्यात सोशल मीडियावरील पॉडकास्टिंग व्लॉगिंग या साऱ्यांचा विचार या अर्थसंकल्पाने केला. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग आणि कॉमिक्स या (एव्हीजीसी) क्षेत्राला 2030 पर्यंत 20 लाख लोक लागतील. त्यासाठी एव्हीजीसी कंटेंन्ट क्रिएटर लॅब 1500 शाळा आणि 500 महाविद्यालयात सुरू करण्याचे सीतारामन यांनी जाहीर केले. मुंबईतील आयआयसीटी म्हणेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून या लॅब उघडल्या जातील. पूर्व भारतात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन सुरू केले जाणार आहे.
केवळ ऐतिहासिक स्थळे किंवा तयार यादीनुसार इथून तिथे भटकण्याऐवजी तरुण पिढी अत्यंत वेगळ्या तऱ्हेने प्रवास करते. हे लक्षात घेऊन सीतारामन यांनी इको टुरिझमला चालना देण्याचा विचार मांडला आणि दुसरीकडे विदेशी सहलींवर आकारला जणारा एलआरएस फक्त दोन टक्क्यांवर आणला. विदेशात शिक्षण घेणाऱ्या तरुणांनाही या कर कपातीचा फायदा होईल. मिलेनिअल्स आणि जेन झी हा वर्ग सतत इलेक्ट्रॉनिक्स, फॅशनचे कपडे आणि इतर वस्तू आंतरराष्ट्रीय पातळीवर खरेदी करत असतो. ब्रॅण्ड ही त्यांची पहिली पसंती असते. हे लक्षात घेऊन आयात केल्या जाणाऱ्या अशा वस्तूंवरील कर सीतारामन यांनी दहा टक्क्यांवर आणला. त्यातून स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि आयात कपडे स्वस्त होतील.
आर्टिफिशल इंटिलिजन्स (ए-आय) हा शब्द आता घोषणेपुरता मर्यादित नसून शासन-प्रशासन, शिक्षण, शेती-वाडी, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रही त्याने व्यापले आहे. सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात किमान बारा वेळा ए-आयचा वापर झाला. ए-आयमुळे नोकऱ्या जाण्याची भीती जेन झीला सतावत असताना ए-आय क्षेत्राला पायाभूत सुविधांसारखेच समजण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. नवी पिढी प्रचंड काम करते, करिअरच्या मागे धावते आणि त्यातून ओघानेच मानसिक ताणांची शिकार बनते. या विषयाला अर्थसंकल्पाने प्रथमच हात घातला. मानसिक ताण, नैराश्य आणि मानसिक आरोग्य याबद्दल खुलेपणा स्वीकारत सीतारामन यांनी नॅशनल मेंटल हेल्थ सर्व्हे-2 उत्तर भारतासाठी जाहीर केला. रांची आणि तेजपूरमधील संस्थाही अद्ययावत करण्याची घोषणा त्यांनी केली.