मुंबई

मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त; कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश पाळण्याच्या सूचना

अविनाश सुतार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि पक्षाच्या अन्य आमदारांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड केल्याने शहरातील सेना समर्थकांमधून हिंसक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड सुरु केल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि कायदा व सुव्यवस्थाचे सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मुंबईतील सर्व अप्पर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांची बैठक घेतली आहे. यात मुंबई शहरात कलम १४४ सीआरपीसी अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश पाळण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतलेल्या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. मुंबई शहरातील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये, मंत्री, खासदार, आमदार व महत्वाचे नगरसेवक यांची कार्यालये, निवासस्थान, शाखा अशा ठिकाणी बंदोबस्त वाढविण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. सोबतच स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवून आगाऊ माहिती काढण्याच्या सुचना स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.

सध्या सुरू असलेले राजकीय कार्यक्रम, बैठका याठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याबरोबरच विशेष शाखेने सोशल मीडियावर लक्ष ठेवून संबधितांना आवश्यक माहिती लगेच द्यावी. कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही. हिंसा करणार नाही आणि तोडफोड करणार नाही, अशा सुचना देण्यासोबतच स्थानिक ठिकाणी संभाव्य राजकीय हालचालीबाबत माहिती घेवून योग्य कारवाई करण्याचे आदेश संजय पांडे यांनी दिले आहेत.

शहरात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर लागणार नाही, याची दक्षता घेत आवश्यक प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. एकूणच शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. यादृष्टीने पोलिसांनी सजग राहुन कर्तव्य करणे अपेक्षित आहे, अशा सुचना देण्यात आल्याचे पोलीस उप आयुक्त (अभियान) व जनसंपर्क अधिकारी संजय लाटकर यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT