मुंबई : मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून, अखेर पाणी न पिण्याचा निर्धार सोडत मनोज जरांगे पाटील यांनी संध्याकाळी पाणी प्याले. त्यांनी यावेळी एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
जरांगे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ‘मला माझ्या मराठा जातीला, माझ्या लेकराला मोठं करायचं आहे. हेच शब्द बोलण्यासाठी मला पाणी प्यावं लागलं. हा लढा शेवटचा असून, मराठा बांधवांनी मला शेवटची साथ द्यावी,’ असे आवाहन केले. उपोषणादरम्यान होत असलेल्या वेदना आणि त्रासाचा उल्लेख करत, ‘मला किती त्रास होतोय हे फक्त मलाच माहीत आहे,’ असे ते म्हणाले.
जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला. ‘हेच आंदोलक आंतरवालीमध्येही होते, पण इथे कुणीतरी षडयंत्र रचले आहे,’ असा संशय त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी काही नेत्यांना इशारा देत म्हटले, ‘माझ्या नादी लागू नका. मला माहिती आहे तुम्ही आधी किती भिकारी होता.’
जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांतता आणि शिस्त पाळण्याचे आवाहन केले. ‘गोंधळ घालू नका नाहीतर गावाकडे परत जा,’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी खडसावले. त्यांनी आंदोलकांना वाहने मैदानावर व्यवस्थित पार्क करण्यास सांगितले. तसेच, ‘मुंबईकरांना त्रास होईल असे वागू नका, मराठ्यांचा गर्व वाटेल असे वागा,’ अशी विनंती केली.
‘मी समाजाचा अपमान होईल असे कधीही वागत नाही. कुणालाही त्रास झाल्याची माझ्याकडे परत तक्रार येता कामा नये.,’ असे सांगत त्यांनी सर्वांना उच्च न्यायालयाच्या नियमांचे आणि सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले. त्यांनी कायद्याचा आदर करण्याचे आवाहन केले. हा विजय मिळवून देण्याचा लढा आहे, हरण्याचा नाही, असे सांगत त्यांनी मराठा समाजाला संयमाने आणि एकजुटीने वागण्याची सुचना केली.