

Maratha Reservation Protest
मुंबई : आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांनी महिला पत्रकारांना योग्य सन्मान दिला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगानेही आवाहन केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील आंदोलकांना सूचना केल्या आहे. मुंबईत किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही पत्रकारांना त्रास देऊ नका, अशी समज जरांगे यांनी आंदोलकांना दिली आहे.
आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या कॅमेरामन आणि इतर माध्यम प्रतिनिधींना मागून दगड मारणे, त्यांचे कपडे ओढणे, महिला पत्रकारांचे कपडे ओढणे असले प्रकार सुरू असल्याची तक्रार महिला पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली. याबाबतचे पत्रकही टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने जारी केले आहे.
वार्तांकन करताना महिला पत्रकार आणि इतर माध्यम प्रतिनिधींना वारंवार गैरवर्तन आणि असभ्य वागणुकीला तोंड द्यावे लागत असून, या घटनेचा मुंबई मराठी पत्रकार संघाने निषेध केला आहे. अशा गैरवर्तनासाठी जबाबदार असलेल्यांवर जरांगे पाटील यांनी कठोर कारवाई करावी, असे आवाहन पत्रकार संघाने केले आहे.
मुंबईत मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात महिला पत्रकारांना धक्काबुक्की करणे, त्यांचे कपडे ओढणे, जबरदस्तीने बूम माईक हिसकावणे...असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पत्रकारांच्या अनेक संघटनांनी केलेल्या आहेत. अशा प्रकारचा त्रास देणे चुकीचे असून तरांना कोणताही त्रास आणि मनस्ताप होणार नाही, याची काळजी घ्यावी. मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना काळजी घेण्याबाबत वारंवार केलेली सूचना योग्य आहे, असं विजया रहाटकर यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे.
गावाकडचे पोर आहेत त्याना समजून घ्या त्यांना सवय आहे कुठे गेले तरी दगडे मारायचे. ते गावचे आहेत पत्रकार यांनी समजून घ्या, असं जरांगे पाटील यांनी सांगितले. पण मुंबईत किंवा महाराष्ट्रात असतील पत्रकाराना त्रास देऊ नका अशी समजही जरांगे-पाटील यांनी दिली आहे.