Mumbai Mayor Reservation Pudhari
मुंबई

Mumbai Mayor Reservation: महापौर आरक्षण सोडतीवर ठाकरे गटाचा बहिष्कार; किशोरी पेडणेकर आक्रमक, काय आहे आक्षेप?

महापौर आरक्षण सोडत प्रक्रियेवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत बहिष्कार टाकला असून मंत्रालयात वाद झाला. नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबईच्या आरक्षण सोडतीवर प्रश्न उपस्थित करत ओबीसी महिलांवर अन्याय झाल्याचा आरोप केला.

Rahul Shelke

Mayor Reservation Lottery Sparks Clash: राज्यातील महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर होत असताना आज मंत्रालयात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाने आरक्षण सोडत प्रक्रियेवर बहिष्कार टाकला असून, यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला.

आरक्षण सोडत सुरू असतानाच ठाकरे गटाकडून काही मुद्द्यांवर हरकत घेण्यात आली. त्यानंतर भाजप आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. अखेरीस ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी बाहेर पडले आणि त्यांनी सोडतीचा निषेध करत बहिष्कार जाहीर केला.

ओबीसी महिलांवर अन्याय झाला; पेडणेकरांचा आरोप

किशोरी पेडणेकर यांनी विशेषतः मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप नोंदवला.
त्या म्हणाल्या की, “याआधीही दोन वेळा आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गात होतं. मग त्या वेळी ते ओबीसीमध्ये का टाकलं नाही?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी ओबीसी प्रवर्गातील महिलांवर अन्याय झाल्याचा आरोप केला.

माधुरी मिसाळ यांची भूमिका काय?

या वादानंतर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलं की, ठाकरे गटाकडून आलेल्या तक्रारी आणि आक्षेपांची नोंद घेतली जाईल आणि त्याबाबत पुढील प्रक्रियेनुसार निर्णय घेतला जाईल.

मुंबई महापौरपद खुल्या प्रवर्गात

दरम्यान, आजच्या आरक्षण सोडतीमध्ये मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गाचं (महिला) आरक्षण निघालं आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय हालचाली आणखी वेगाने सुरू झाल्याचं चित्र आहे.

महिलांचं प्रतिनिधित्व वाढण्याचा अंदाज

आरक्षण प्रक्रियेमुळे राज्यातील अनेक महापालिकांमध्ये महिला महापौरांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः काही ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिला महापौर निवडली जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT