Tata Mumbai Marathon Pudhari
मुंबई

Tata Mumbai Marathon: टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासोबत समाजजागृतीचा उत्सव, ड्रीम रनमध्ये 27 हजारांचा सहभाग

पर्यावरण, आरोग्य, महिला-सुरक्षा, दिव्यांग हक्क, देशभक्ती आणि सामाजिक संदेशांनी मॅरेथॉन रंगली; कलाकार, राजकारणी आणि पोलिसांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: धावण्याचा आनंद लुटण्यासह सहभागाचा जल्लोष आणि सामाजिक विषयांवर जनजागृती असे अनोखे चित्र यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये पाहायला मिळाले. यंदाच्या ड्रीम रनमध्ये 27 हजारांहून अधिक जणांनी आपला सहभाग नोंदवला. त्यात विविध सेवाभावी संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांचा समावेश होता.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ड्रीम रनला हिरवा कंदील दाखवला. मॅरेथॉनमधील ड्रीम रनही नेहमीच उत्साह वाढवणारी असते. यंदाही त्याला अपवाद नव्हता. यावेळी विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात आली.

‌‘वास्तव‌’ या पुरुषांच्या न्यायहक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेने राज्यात दरवर्षी 3 हजार पुरुष महिलांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा दावा करत पुरुषांच्या संबंधित तक्रार निवारणासाठी राज्यात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची मागणी करत यंदाच्या मॅरेथॉनमध्ये जनजागृती केली.

सीपीएएने लढा देणारी झाशीची राणी आणि कॅन्सरचे प्रतिकात्मक रुप सादर करत संस्थेशी संबंधित कॅन्सर वॉरियर्सच्या साहाय्याने या भयानक रोगाशी सकारात्मक मानसिकतेने कसा लढा देता येईल याचा संदेश मॅरेथॉनच्या माध्यमातून लोकांना दिला.

रस्ते वाहतुकीमध्ये शिस्त आणण्यादृष्टीने तसेच अपघात टाळण्यासाठी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरा. गाडी चालवताना मोबाईल वापरु नका. मद्यपान करून ड्रायव्हिंग करू नका, अशा आशयाच्या फलकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. काहींच्या हातात धुम्रपान निषेधाचे बोर्ड होते. महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासह चाईल्ड केअरबाबतही अनेकांनी जनजागृती केली गेली.

मुंबईतील वृक्षतोड रोखून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या तरुण-तरुणींनी तब्बल सहा तासांच्या मेहनतीने आपले संपूर्ण शरीर पर्यावरणाशी साधर्म्य बॉडीपेंटिंगच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले. ग्रामीण भागात चांगल्या शाळा उभाराव्या. तसेच शाळांचा दर्जा सुधारावा, अशा आशयाचे फलकही पाहायला मिळाली.

मुंबईतील कदम कुटुंबाने एका अनोख्या पद्धतीने ऑलिम्पिक खेळांचा प्रचार आणि प्रसार केला. या कुटुंबाची खासियत म्हणजे एक भाऊ आणि त्याच्यासह बहिणींनी मिळून स्वत:ला संपूर्णपणे बुद्धिबळ, तिरंदाजी, हॉकी, वेटलिफ्टिंग, रायफल शूटिंग, बॉक्सिंग आणि कुस्तीचा पेहराव केला होता.

सामाजिक विषयांसह नवीन पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाने ऑपरेशन सिंदूर वीरांना सलामी देत देशभक्तीची आठवण करून दिली. पारंपारिक वेशभूषा, वासुदेव आणि महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील सहभागींनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत मॅरेथॉनमध्ये अनोखे रंग भरले.

व्हीलचेअर रनमध्ये दिव्यांग सहभागी

दिव्यांग व्यक्तींच्या गरजा आणि त्यांच्या अधिकारांसाठी कार्यरत नीना फाऊंडेशनच्यावतीने यंदाच्या मॅरथॉनमध्ये अनेकांनी व्हीलचेअर रनमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. तब्बल 18 आणि 20 वेळा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांचीही उपस्थिती होती. त्यांचा उत्साह एखाद्या धडधाकट व्यक्तीलाही लाजवेल असा होता. जन्मत:च किंवा एखाद्या अपघातामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करुन येणारा प्रत्येक क्षण प्रचंड ऊर्जेने कसा जगावा, हे यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते.

कलाकार, राजकारणी, पोलिसांचा सहभाग

ड्रीम रनमध्ये अभिनेता आमीर खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाला. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहकुटुंब धावण्याचा आनंद आगळावेगळा आहे. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि नियमित व्यायाम करावा, असं आवाहन त्याने चाहत्यांना केले.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीसुद्धा या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. मी बऱ्याच काळापासून मुंबई मॅरेथॉनबद्दल ऐकत होतो. आज प्रत्यक्ष धावलो. तरुणांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे आणि स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवू नये. आमच्यासारखे लोक मुंबईत येतात तेव्हा शहराचा बदललेला चेहरा-मोहरा लक्षात राहतो. कोस्टल रोडसारखी पायाभूत सुविधा बांधली जाईल अशी आम्हाला कल्पनाही नव्हती. शहराचा वेगाने कायापालट होतोय, ही आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले.

फिटनेस आणि शिस्त यासाठी प्रसिद्ध असलेले मुंबई पोलीस दलातील सुपरकॉप विश्वास नांगरे-पाटील यांनीही मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमधील आपला अनुभव दरवर्षीपेक्षा वेगळा असल्याची प्रतिक्रिया दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT