

मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सीईटी परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेत यंदा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने लागू केलेले आधार कार्ड आणि अपार आयडीचे नियम आता विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आधार, अपार आयडी आणि दहावीबारावीच्या गुणपत्रिकेतील नावांमध्ये असलेल्या किरकोळ तफावतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
यंदापासून सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीसाठी आधार व अपार आयडीची शंभर टक्के पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र या पडताळणीदरम्यान नाव अक्षरशः जुळले तरच अर्ज पुढे जातो.
नावाच्या स्पेलिंगमधील फरक, मधले नाव, आडनावातील बदल किंवा जुन्या शासकीय नोंदींतील विसंगती आढळल्यास विद्यार्थ्यांचा अर्ज नाकारला जात आहे. ही नावातील तफावत बहुतांश वेळा विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे नसते. शालेय दाखले, जन्मनोंदणी, जुन्या प्रशासकीय प्रक्रियांतील त्रुटी यामुळे अनेक विद्यार्थ्यांची नावे वेगवेगळ्या दस्तऐवजांत वेगळी नोंदली गेलेली आहेत.
यामुळे सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
जेईई मुख्यसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये नावातील अशा विसंगती असतानाही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची मुभा दिली जाते आणि अंतिम टप्प्यावर कागदपत्रांची पडताळणी होते, तर सीईटी कक्ष अशाप्रकारे मुभा द्यावी, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे.
सीईटी कक्षाने या प्रकरणी अद्याप ठोस आणि दिलासादायक भूमिका स्पष्ट केलेली नाही. विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे परीक्षेची संधी मिळावी की केवळ कागदोपत्री काही त्रुटीत अडकवून बाहेर काढले जावे, हा निर्णय सीईटी कक्षाला घ्यावा लागणार आहे.