विरोधकांनी तटकरेंच्या बोटाला जखम झाल्‍याचा फोटोही शेअर केले होते. यावर त्‍यांनी स्‍पष्‍टीकरण दिल्‍यानंतर सुषमा अंधारे यांनी काही सवाल उपस्‍थित केले आहेत.  Pudhari Photo.
मुंबई

Ashok Kharat controversy|'रक्ताच्या अभिषेका'वर सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण, हसून सुषमा अंधारे म्हणाल्या, "सगळेच किती योगायोग.."

Ashok Kharat controversy|रुपाली चाकणकरांच्या कार्यकर्त्यांनीही केला होता गाडीच्या दारात अडकून दुखापत झाल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

Ashok Kharat controversy

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात यांच्या फार्म हाऊसवरील ईशानेश्वर मंदिरात राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी अनामिका कापून रक्ताचा अभिषेक केला होता, असा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला होता. विरोधकांनी तटकरेंच्या बोटाला जखम झाल्‍याचा फोटोही शेअर केले होते. यावर तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांच्या बोटाची जखम कारचा दरवाजा लागून झाली का? असा सवाल करत सगळेच किती योगायोगाच्या घटना आहेत, असा टोला लगावला आहे.

गाडीच्या दारात बोट सापडल्याने अनामिकेला दुखापत : सुनील तटकरे

अशोक खरात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित ज्येष्ठ वकील आहेत. लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी अलिबाग येथे माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. येथे प्रवीण ठाकूर मला भेटायला आले होते. ते उमेदवार आनंद गीतेचं काम करत होते; पण कौटुंबिक नात्याने ते मला भेटायला आले होते. त्यांना भेटून मी निघत असताना त्यांनी गाडीचा दरवाजा लावला. त्यावेळी गाडीच्या दारात बोट सापडल्याने माझ्या अनामिकेला दुखापत झाली होती."

'कोणता अर्थ कोठे लावणार, यापेक्षा दुर्दैव काय?'

गाडीच्या दारात बोट सापडल्याने जखम झाली. सोंडीच्या हॉस्पिटलमध्ये मला पाच टाकेही पडले. त्यानंतर मी दिल्लीत गेलो. त्यावेळीही माझ्या बोटावर जखम होती. दिल्लीतून आल्यानंतरही बँडेज तसेच होते. याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल, तर दुर्दैव याच्यापेक्षा काय म्हणू, असेही तटकरे म्हणाले.

हसून सुषमा अंधारे म्हणाल्या, "सगळेच किती योगायोग..."

या प्रकरणी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "जेवढं मला कळतं, साधारणतः गाडीच्या दरवाजामध्ये माणसाचा अंगठा अडकू शकतो, तर्जनी अडकू शकते किंवा करंगळी अडकते; पण काय योगायोग की रुपाली चाकणकर यांच्या अनामिकेलाही गाडीच्या दरवाजामुळे जखम झाली होती. आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की, त्यांच्या तर्जनीलासुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली. एकूण काय तर हातातले गंडे-दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते, सगळेच किती योगायोग आहेत," असा टोलाही अंधारे यांनी लगावला.

चाकणकरांच्या कार्यकर्त्यांनी काय केला होता दावा?

पुण्याच्या धायरी येथील कार्यकर्त्यांनी दावा केला आहे की, "रूपाली चाकणकर यांनी ठेवलेले व्हॉट्सॲपचे स्टेटस चुकीच्या पद्धतीने फोटो सोशल मीडियावर दाखवले जात आहेत. रूपाली चाकणकरांच्या बोटाला झालेली दुखापत कोणताही मंत्रतंत्राचा विषय नाही. रुपालीताई आमच्या इथे आरतीसाठी येतात. त्या दिवशी पण आरतीचं नियोजन होते. आम्ही ताईंना घ्यायला रिसीव्ह करायला वरती गेलो होतो. गाडीतून उतरल्यानंतर गाडीचा दरवाजा बंद करताना त्यांचे बोट दरवाज्यात अडकले. तिथे ताईंना रक्त वगैरे येत होतं. जखमेवर टिशू पेपर लावून ताई आरतीला आल्या. विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या आरतीचा व्हिडिओही अकाउंटवर आहे. या व्हिडिओमध्ये ताईंची एन्ट्री दिसेल. त्यामध्ये ताई अनामिकेला टिशू पेपर लावून खाली आरतीला आलेल्या दिसतील. तिथे ताईंनी आरती केली, त्यांचा सत्कार केला. आताचा आम्ही व्हायरल होणारा फोटो हा धक्कादायक पद्धतीने दाखवला जातोय".

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT