प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे यांची संयुक्त सभा दादर येथील ‘शिवतीर्था’वर होत आहे. दोन्ही भाऊ 20 वर्षांनी एकत्र आले तर सभाही तशीच व्हावी असा शिवसेना-मनसेचा प्रयत्न राहील. या सभेने शिवाजी पार्क मैदान ओेसंडून गर्दीने आसपासचे चौकही व्यापले जाऊ शकतात. त्यासाठी काही मोजक्या ठिकाणी सभेचे थेट प्रक्षेपण केले जाईल, असेही सांगितले जात आहे.
मुंबई :
मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असल्याने आजचा रविवार प्रचाराचा सुपर संडे ठरणार आहे. हाच मुहूर्त साधत उद्धव आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा शिवाजी पार्क मैदानावर होत असून, ही सभा विक्रमी व्हावी म्हणून दोन्ही भावांच्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत.
महापालिकांच्या निवडणुकीचे मतदान 15 जानेवारी रोजी होईल. दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारीला निकाल लागेल. या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा 13 जानेवारी रोजी थंडावतील. याचा अर्थ प्रचाराला अवघे तीनच दिवस शिल्लक आहेत.
रविवारपासून शेवटप्या टप्प्यातील प्रचार सुरू होत असून, या शेवटच्या निर्णायक टप्प्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (उबाठा), मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रमुख नेत्यांच्या सभांनी राज्यातील शहरे अक्षरश: घुसळून निघतील.
त्यातच प्रचाराच्या या टप्प्यात 11 जानेवारीचा रविवार शेवटचा सुट्टीचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. सुट्टीमुळे जास्तीत जास्त मतदारांच्या भेटी घेण्यासाठी उमेदवारांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मोटारसायकल रॅली, पदयात्रा, नेत्यांच्या सभांबरोबरच रोड शो, कॉर्नर सभा रविवारी कुठे घ्यायची याची सर्व तयारी उमेदवारांनी करून ठेवली आहे.
रविवारी जास्तीत जास्त सभा घेण्यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी भर दिला आहे. भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये जाहीर सभा आहे, तर पिंपरी-चिंचवड येथे त्यांचा रोड शो आयोजित केला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पनवेल आणि पुणे येथे जाहीर सभा होणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुनील तटकरे यांची मुंबईत प्रचार सभा होणार आहे.