Shiv Sena BJP Alliance History Pudhari
मुंबई

Shiv Sena BJP Alliance: मातोश्रीचा ‘रिमोट’ ते भाजपचा ‘गेम’… मुंबईत सत्तेचा खेळ कसा बदलला? 1990 पासूनचा प्रवास जाणून घ्या

Shiv Sena BJP Alliance History: 1990च्या दशकात हिंदुत्वाच्या आधारावर सुरू झालेल्या शिवसेना–भाजप युतीने महाराष्ट्राचं राजकारण बदललं. युतीत ‘ज्युनिअर पार्टनर’ असतानाही भाजपने संघटन वाढवून हळूहळू आपली ताकद वाढवली.

Rahul Shelke

Shiv Sena BJP Alliance History Mumbai Politics: मुंबईच्या राजकारणात सेना–भाजप युती हा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे. कधी विचारधारेच्या नावाखाली जवळीक, तर कधी सत्तेसाठीची रस्सीखेच, या युतीने गेल्या तीन दशकांत अनेक वळणं पाहिली. आता 2026च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने मोठी कामगिरी केल्यानंतर या युतीच्या राजकीय इतिहासाची कहाणी पुन्हा चर्चेत आली आहे.

90च्या दशकात हिंदुत्वाचा गजर

सेना–भाजप युतीची सुरुवात 1990च्या दशकात झाली. त्या काळात हिंदुत्व हा दोघांनाही जोडणारा समान मुद्दा होता. शिवसेना आणि भाजप एकत्र आले आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रभावाला आव्हान उभं राहिलं. या युतीचा सर्वात मोठा फायदा भाजपला झाला, असं राजकीय विश्लेषक सांगतात. कारण, महाराष्ट्राच्या अनेक भागांत भाजपची ताकद वाढण्यासाठी शिवसेनेच्या प्रभावाचा उपयोग झाला.

1985च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडे फारशी ताकद नव्हती. पण पुढच्या काही वर्षांत युतीच्या जोरावर भाजपने राज्यात आपलं जाळं वाढवलं. 2014 पर्यंत भाजपने मोठी झेप घेतली होती, यामागे युतीचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं.

1995: काँग्रेसला धक्का, महाराष्ट्रात सत्ता

1995ची विधानसभा निवडणूक या युतीसाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरली. शिवसेना–भाजप युतीने काँग्रेसला सत्तेतून बाजूला सारत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. त्या काळात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पण सरकार चालवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या.

त्या काळात बाळासाहेब ठाकरे हे सरकारच्या निर्णयांवर मोठा प्रभाव टाकत होते. “सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे आहे” असं ते जाहीर सभेत म्हणतं. अनेक वेळा भाजपला शिवसेनेच्या भूमिकेशी जुळवून घ्यावं लागायचं. तरीही भाजपचे नेते परिस्थिती सांभाळत युती टिकवण्याचा प्रयत्न करत होते.

भाजप ‘ज्युनिअर पार्टनर’

युतीत भाजप हा अनेकदा ‘ज्युनिअर पार्टनर’ होता. तरीही त्यांनी शिवसेनेची साथ ठेवत स्वतःची ताकद वाढवण्याचा दीर्घकालीन प्लॅन आखला. मुंबईतही भाजपने आपला मतदारवर्ग वाढवण्यासाठी सातत्याने काम केलं.

तेव्हा मुंबईचा चेहरामोहरा बदलत होता. शहरात स्थलांतर वाढलं, नवे मतदार जोडले गेले आणि लोकसंख्येचं स्वरूप झपाट्याने बदललं. याच बदलत्या मुंबईत भाजपने संघटन मजबूत केलं. स्थानिक नेते, कार्यकर्त्यांचं नेटवर्क, आणि पुढे डिजिटल टीम्स यावर भर दिला.

महापालिकेतील भाजपची वाढती ताकद

मुंबई महापालिकेत भाजपची कामगिरी काळानुसार वर-खाली होत राहिली, पण हळूहळू ताकद वाढली. सुरुवातीला भाजपचा फारसा प्रभाव नव्हता. पण काही निवडणुकांनंतर जागांची संख्या वाढत गेली. यामागे संघटन आणि शहरातील बदलांमुळे भाजपचा विस्तार होत राहिला.

2012 नंतर समीकरणं बदललं

2012 नंतर शिवसेना–भाजप नात्यातला दुरावा वाढत होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचं नेतृत्व बदललं आणि भाजपही मोदी युगात वेगाने पुढे गेला. भाजपला आता स्वतःचा चेहरा आणि राष्ट्रीय ताकद मिळाल्याने युतीचं अवलंबित्व कमी झालं, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

तीन दशकांच नातं

2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केली. पक्षाच्या रणनीतीकारांच्या मते, यामागे फक्त प्रचार नव्हता, तर महिन्याभर चाललेलं डेटा अ‍ॅनालिसिस, बूथ पातळीवरील तयारी आणि सातत्याने सुरू असलेलं ग्राउंडवर्क कारणीभूत ठरलं.

या निवडणुकीत भाजप नेत्यांनी आणि युतीतील प्रमुख चेहऱ्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात प्रचार केला. त्याच वेळी विरोधकांची तयारी आणि ग्राउंडवर्क कमी पडल्याची चर्चा झाली.

‘मराठी’चा मुद्दा अजूनही जिवंत

या निकालानंतरही एक गोष्ट स्पष्ट होते. मुंबईत काही भागांमध्ये ‘मराठी’चा मुद्दा अजूनही प्रभावी आहे. काही मनसेला आणि काही प्रमाणात ठाकरेंच्या शिवसेनेला त्याचा फायदा होताना दिसतो. पण एकूणच बदलत्या शहररचनेत आणि नव्या मतदारांच्या अपेक्षांमध्ये आता विकास आणि प्रशासन हे मुद्दे जास्त वरचढ ठरत असल्याचं चित्र आहे.

सेना–भाजप युती ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात गुंतागुंतीच्या नात्यांपैकी एक आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुरू झालेली ही मैत्री अनेकदा मतभेद, सत्तासंघर्ष आणि बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या रूपात दिसली. आता मुंबई महापालिकेच्या नव्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात होत असल्याचे संकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT