Mumbai Municipal Corporation election | मुंबईत ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग

महायुतीने उलथवली ठाकरेंची सत्ता
Mumbai Municipal Corporation election
मुंबई/ठाणे : मुंबईसह 9 महानगरपालिका असलेल्या महामुंबई प्रदेशाने भाजप-शिवसेना महायुतीलाच आपली पसंती दिली आहे. या विजयाचा जल्लोष साजरा करताना कार्यकर्ते. (पीटीआय फोटो)
Published on
Updated on

राजन शेलार

मुंबई : मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वर्चस्वाला सुरुंग लावण्यात अखेर भाजपला यश आले. विशेष म्हणजे, उद्धव व राज ठाकरे या ठाकरे बंधूची ऐतिहासिक युतीही पक्षाला पराभवापासून वाचवू शकली नाही. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, नाशिक ते अगदी छत्रपती संभाजीनगरपर्यंत उद्धव सेनेचा पराभव झाला. मुंबईत 2017 मध्ये मिळालेल्या 84 जागांचा आकडाही पार करण्यात ठाकरेंना यश आले नाही. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत शिंदे सेनेचा वारू रोखत त्यांना वरचढ होऊ दिले नाही, हीच ठाकरे सेनेसाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल.

देशातील अनेक राज्यांपेक्षा सर्वाधिक मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप, शिंदे सेना, ठाकरे सेना, मनसे, काँग्रेस आदी सर्व पक्ष प्रयत्नशील होते. 1997 पासून 2022 पर्यंत सलग 25 वर्षे सत्ता असलेल्या शिवसेना ठाकरे गटासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची लढाई होती. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकसंध असलेल्या शिवसेनेचे 84, तर भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे ठाकरे गटापुढे आव्हान निर्माण झाले होते. याशिवाय भाजप हा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पक्ष होता. त्यामुळे ही निवडणूक ठाकरे गटासाठी म्हणावी तशी सोपी नव्हती. महाविकास आघाडीतून लढताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींतही अपेक्षेप्रमाणे यश मिळू न शकल्याने अखेर उद्धव ठाकरे यांनी आपले बंधू, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युती केली. गेल्या दोन दशकांहून अधिककाळ एकमेकांपासून दुरावलेले हे बंधू भांडणे विसरून मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी एकत्र आले. परंतु, 2017 ते 2026 या नऊ वर्षांत मुंबई महानगर प्रदेशात राजकीय परिस्थिती बदलली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात नवे मतदार नोंदवले गेले. त्यात बिगर मराठी भाषिक टक्का मोठा आहे. मनसेसोबतच्या युतीमुळे मराठी पट्ट्यात मराठी मतांचे विभाजन टळले. मात्र, ठाकरे गटाने जेवढ्या जागा लढविल्या त्याच्या निम्म्या जागासुद्धा त्यांना मिळाल्या नाहीत. यावरून ठाकरेंना मानणारा काही मतदार महायुतीकडे वळल्याने मुंबईवरील तब्बल 25 वर्षांचे ठाकरेंचे साम्राज्य खालसा करण्यात शिंदे आणि भाजप यशस्वी ठरले आहेत.

मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जायचे. येथील महापालिकेत शिवसेनेचा एकहाती कारभार होता. येथील शिवसैनिक, मराठी भाषिक मतदार नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे यांना ठाणे आणि कल्याण डोंबिवलीचा गड गमवावा लागणार हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतच स्पष्ट झाले होते. मात्र, भाजपच्या शक्तीपुढे ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच नवी मुंबई, मीरा-भाईंदर, पनवेल येथे ठाकरे सेनेला पराभवाचा सामना करावा लागला. नवी मुंबई महापालिका ही सुरुवातीपासून गणेश नाईक यांच्या हातात आहे. नाईक ज्या पक्षात जातात, त्या पक्षाची सत्ता नवी मुंबई महापालिकेत येते, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे ठाकरे सेनेचा तेथे निभाव लागला नाही. शेजारच्या मीरा-भाईंदरमध्येही ठाकरे गटाने फारशी ताकद लावली नव्हती. त्यामुळे येथील लढत भाजप आणि शिंदे गटात झाली. उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाने पाय रोवण्याचे कधीही प्रयत्न केले नसल्याने येथे ठाकरे गटाच्या पदरी अपयश पडले. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीपुढे भाजपसह शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचेही काही चालले नाही. ठाकूर कंपनीने त्यांचा सुफडासाफ करत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला.

मराठी मतांचे ध्रुवीकरण रोखण्यात अपयश

उद्धव व राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर अनेक महापालिकांमध्ये चमत्कार घडून सत्ता येईल, असे स्वप्न मराठी माणसाने पाहिले. त्यांच्या मुंबई, ठाणे, नाशिक येथे दोघांच्या संयुक्त सभेला झालेली गर्दी आणि शिवाजी पार्क मैदानावर महायुतीच्या सभेला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता हे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरणार, असा दावाही केला जाऊ लागला. सोशल मीडियावरील चर्चेतही ठाकरे बंधूंनी आघाडी घेतली होती. मुंबई महाराष्ट्रपासून वेगळी होऊ देणार नाही, असे ठणकावत मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रासाठी आम्ही आमची भांडणे विसरून एकत्र आलोय, असे सांगत मुंबईचे अदानीकरण होत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प, जमिनी उद्योगपती अदानीला दिल्याचा आरोप करत त्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले होते. त्यामुळे आता चुकलात, तर भविष्यात तुम्हाला कोणी माफ करणार नाही. मुंबईला आणि महाराष्ट्राला वाचविण्यासाठी मराठी माणसाला तुम्हीही एकत्र या, अशी भावनिक साद ठाकरे बंधूंनी घातली होती. परंतु, ठाकरे बंधूंचे हे भावनिक आवाहन मराठी मतांचे ध्रुवीकरण रोखण्यात अपयशी ठरले. मुंबईच्या उपनगरात दोन्ही ठाकरे बंधूंना फारसे यश मिळालेले नाही. अमराठी भाषिकांची वाढती ताकद आणि याच ताकदीने भाजपला दिलेले पाठबळ हेच ठाकरेंच्या पराभवाचे कारण मानले जात आहे.

शिंदे सेनेमुळे ठाकरेंची सेना अडचणीत

मुंबईत ठाकरेंच्या सेनेची 64 हून अधिक मतदारसंघांत शिंदे सेनेच्या आणि 94 हून अधिक मतदारसंघांत भाजपविरोधात लढाई झाली. या लढाईत शिंदे सेनेला मिळालेल्या जागा पाहता शिवसेना एकसंध राहिली असती, तर भाजपपेक्षाही त्यांना जास्त जागा मिळाल्या असत्या, असे चित्र दिसले. मात्र, शिवसेनेच्या फुटीमुळे कार्यकर्त्यांबरोबरच मराठी भाषिक मतदारांच्या विभाजनाचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसला. परंतु, अख्या मुंबईत शिंदे सेनेला ठाकरे सेनेपेक्षाही जास्त मते मिळू शकलेली नसल्याने आजही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, ठाकरेंच्या सेनेतील माजी नगरसेवक आपल्या गळाला लावूनही त्याचा फारसा फायदा शिंदे सेनेला झालेला नाही, हेही तितकेच खरे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news