Maharashtra election results : राज्यात स्वबळासह 4 समीकरणे, निवडणुकीत सरशी मात्र भाजपचीच
मुंबई : गौरीशंकर घाळे
29 पैकी 25 महापालिकांत कुठे स्वबळावर, तर कुठे महायुतीतील मित्रपक्षांना सोबत घेत भाजपने विरोधी आघाडीला अक्षरशः भुईसपाट केले आहे. केवळ तीन महापालिकांत महायुती एकत्र लढली. उर्वरित ठिकाणी कुठे शिंदे गट तर कुठे अजित पवारांचा गट तर कुठे आरपीआयसोबत भाजपने युतीचे समीकरण जुळविले. या चारही समीकरणांत भाजपने यशाला गवसणी घातली आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात ठाकरे बंधूंचे वर्चस्व मोडून काढताना पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत पवार काका-पुतण्याचे राजकारण भुईसपाट केले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही भाजपने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे.
राज्यभरातील या महापालिका निवडणुकांसाठी भाजपने प्रत्येक महापालिकांसाठी युती, महायुतीचे स्वतंत्र गणित जुळविले होते. भाजपने 14 महापालिका स्वबळावर लढविल्या; तर प्रत्येकी दोन दोन महापालिकांत अनुक्रमे आरपीआय आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीत निवडणुका लढविल्या होत्या. आठ महापालिकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करून निवडणुका लढविल्या; तर केवळ तीन महापालिकांत शिंदे गट, अजित पवार गट आणि आरपीआय अशी पारंपरिक महायुती म्हणून निवडणूक लढविली.
सांगली, धुळ्यात भाजपचे यश
सांगली - मिरज - कुपवाड महापालिकेतही भाजपने यश मिळविले आहे. धुळे महापालिकेतही 50 जागा सर करत बहुमताचा टप्पा पार केला. जालन्यातही 41 जागांसह भाजपने बहुमत गाठले आहे. अमरावती आणि सांगली - मिरज - कुपवाड महापालिकेतही भाजपने सत्तेचे सोपान गाठले आहे.
पनवेल, इचलकरंजी आणि कोल्हापूर
या तीन महापालिकांत भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार आणि आरपीआय अशी पूर्ण महायुती होती. पनवेल महापालिकेत महायुतीने 60 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. तर इचलकरंजीतही भाजपच्या कामगिरीच्या जोरावर महायुती सत्तेत येणार आहे. कोल्हापुरात काँग्रेसने महायुतीला टक्कर दिली.

