मुंबई : लग्नाला नकार दिल्याच्या रागातून 25 वर्षीय तरुणीने 42 वर्षीय प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना सांताक्रुजमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी आरोपी तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला असून जखमी प्रियकरावर व्ही. एन देसाई रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षांचा प्रियकर हा सांताक्रुज येथे राहत असून व्यवसायाने रिक्षाचालक आहे. त्याचे एका आरोपी तरुणीसोबत गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंंबंध होते. तो तिला लग्नाचे आमिष दाखवत होता, मात्र तिच्याशी लग्न करत नव्हता.
आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यामुळे तरुणीच्या मनात प्रियकराबद्दल प्रचंड संताप होता. त्यामुळे त्याला अद्दल घडविण्याच्या इराद्याने तिने बुधवारी त्याला नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनसाठी घरी बोलाविले. जेवणानंतर प्रियकर तिच्या घरी निवांत झोपला होता. यावेळी गाढ झोपेत असताना तिने तिक्ष्ण हत्याराने त्याचे गुप्तांग कापले. या घटनेनंतर तो त्याच्या भावाकडे गेला आणि त्याने घडलेला प्रकार त्याला सांगितला. त्याने त्याला जवळच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. तिथेच त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
रुग्णालयातून माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रियकराच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपी प्रेयसीवर अद्याप अटकेची कारवाई झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.