

मुंबई : तुमच्या प्रत्येक मताची ताकद बदल घडवू शकते. तुमच्या मतांच्या जोरावरच मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती ऐतिहासिक विजय मिळवणार असून, मागाठाणेचेही भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी येथे व्यक्त केला.
कांदिवलीतील जानूपाडा येथे आयोजित केलेल्या जाहीर प्रचार सभेत मंत्री गोयल बोलत होते. यावेळी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर, वॉर्ड क्रमांक 25 च्या महायुतीच्या उमेदवार निशा परुळेकर, वॉर्ड क्रमांक 26 च्या उमेदवार प्रीतम पंडागळे, आप्पा बेलवळकर, वॉर्ड अध्यक्ष पवन तिवारी, महिला वॉर्ड अध्यक्षा सुनयना कदम, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, राहुल भंडारी, राकेश सिंग, अविनाश राय यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणतात, फिट इंडिया बनवायचेय. त्याची सुरुवात ‘फिट मागाठाणे’तून करायचीय. ठाकूर व्हिलेजमध्येही लवकरच कौशल्य सुविधा रोजगार केंद्र सुरू करण्याची घोषणा करून मंत्री पीयूष गोयल म्हणाले, या केंद्रामुळे तरुण-तरुणींना त्यांच्या इच्छेनुसार नि:शुल्क रोजगार प्रशिक्षण मिळेल. स्थानिकांसाठी छोटे रुग्णालयदेखील येथे सुरू करण्याची कल्पना आहे. नॅशनल पार्कमधील वनराणी ट्रेन येत्या 6 जानेवारीपासून सुरू होईल. नववर्षाचा पहिला दिवस आपण आदिवासी बंधू-भगिनींसोबत साजरा करतोय, अशी नोंद करून पीयूष गोयल म्हणाले, मुंबईत प्रत्येकाला घर मिळावे म्हणून आमदार प्रवीण दरेकर यांनी स्वयंपुनर्विकास योजना आणली. त्या योजनेचे आता प्राधिकरण झाले, प्रवीण दरेकरांना या प्राधिकरणाचे अध्यक्ष करून मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला.
तत्पूर्वी आपल्या भाषणात आ. प्रवीण दरेकर म्हणाले की, गेल्या निवडणुकीत निशा परुळेकर यांना नवा चेहरा म्हणून उमेदवारी दिली होती. राजकारणाशी त्यांचा काही संबंध नव्हता. चित्रपटसृष्टीत त्या चांगल्या काम करत होत्या. त्यांना विनंती केल्यावर त्यांनी चित्रपटसृष्टीतील काम सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. केवळ थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला. तरीही गेली सात वर्षे निशा परुळेकर प्रभाग क्रमांक 25 मध्ये दिवस-रात्र काम करत आहेत. आता या विभागातील जनतेने निर्धार पक्का केला की, कोणत्याही परिस्थितीत प्रभाग क्रमांक 25 च्या नगरसेविका निशा परुळेकर होणारच!
विधानसभेत मी आमदार असताना दामू नगर, जानूपाडा, भीमनगर, केतकीपाडा, वैभव नगर, पांडे कंपाऊंड, समता नगर येथील वन जमिनीचा विषय सातत्याने मांडला, बैठका घेतल्या. तुमच्या हा मूलभूत सुविधांचा विषयही पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली आपण सोडवू. तुमच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. मंत्री आशिष शेलार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यात लक्ष घातले आहे. त्याच ठिकाणी तुमचे पुनर्वसन केले जाईल, असेही दरेकरांनी आश्वस्त केले.
दरेकर पुढे म्हणाले की, येथील घाणेरडे राजकारण संपवायचे आहे. विरोधक म्हणतात निशा परुळेकर नगरसेवक झाली तर वनविभागाचे काम होणार नाही. आमचे खासदार पियुष गोयल केंद्रात मंत्री आहेत. ते आमची ताकद आहेत. महाराष्ट्रात सरकार आमचे असून देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत. मी आमदार आहे आणि मुंबई महापालिकेत आमची सत्ता येणार. सत्तेच्या माध्यमातून तुमची कामे होऊ शकतात याची आठवण प्रवीण दरेकर यांनी करून दिली.