

नवी मुंबई : राजेंद्र पाटील
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला सोने प्रतितोळा दोन हजारांनी स्वस्त झाले. गुरुवारी सोने प्रतितोळे 1 लाख 38 हजार रुपयांवर आले. 31 डिसेंबरला 1 लाख 40 हजार रुपये दर होता. दुसऱ्याच दिवशी सोने खरेदी करताना जीएसटी, घडणावळीसह तोळ्याला 1 लाख 52 हजार 140 रुपये मोजावे लागले.
मुंबई सराफ बाजारात गुरुवारी 50 ते 60 तोळे सोन्याची विक्री तर 50 किलो चांदी विक्री झाल्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी जानेवारीत सोने दर प्रतिदहा ग्रॅमला 1 लाख 3 हजार होता. म्हणजेच वर्षभरात सोने तोळ्यामागे तब्बल 32 हजार रुपयांनी महागले. हेच दर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन हजार रुपये प्रतितोळ्यामागे घसरले. गुरुवारी सराफ बाजारात तेजी नव्हती. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या दरात दररोज वाढ होत राहणार असून, सराफ बाजाराला तेजी वर्षभर कायम राहणार आहे.
येत्या मकरसक्रांतीला सराफ बाजाराला पुन्हा तेजी येईल. सोने तोळ्याला 1 लाख 70 हजार रुपयापर्यंत तर चांदी 2 लाख 75 हजार रुपये किलोपर्यंत पोहचेल, असेही कुमार जैन यांनी सांगितले.
चांदीच्या दरात गुरुवारी कोणतीही वाढ झाली नाही. चांदी प्रतिकिलो 2 लाख 43 हजार रुपये होती. तोच दर 31 डिसेंबर रोजी होता. चांदीचे हे दर सोन्याच्या बरोबरीनेच असणार आहेत.
लग्नसराईसह गणपती, नवरात्री, दिवाळीत सलग सोने आणि चांदीच्या दरात वाढ होईल. सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या ही तेवढीच आहे. मुंबईत यंदा लग्नसराईत सराफ बाजारात 450 ते 550 कोटींची मोठी उलाढाल होईल असा अंदाज जैन यांनी बोलून दाखवला. नवीन वर्षात जानेवारीत सोने उच्चांक गाठणार असून पहिल्या सहा महिन्यांत 1 लाख 70 हजार रुपयांपर्यंत सोन्याचा दर जाऊ शकतो.