मुंबई : राजेश सावंत
निष्ठावान लेबल लावत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय घाडी यांना उपमहापौर करून, त्यांना महापालिकेतील मुख्य प्रवाहातून दूर केले आहे. याचा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असला तरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डबल गेम कुणाला कळलाच नाही.
मनसे, शिवसेना, शिवसेना शिंदे गट अशा अनेक पक्षांतून उड्या मारत मारत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले संजय घाडी निष्ठावंत कसे, असा प्रश्न मुंबईकरांना पडल्याशिवाय
राहणार नाही. संजय घाडी यांना सुरुवातीला 1990-91 मध्ये शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभागप्रमुख अशी मोठी जबाबदारी दिली होती. मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलचे ते अध्यक्ष व सिनेट सदस्य होते. नंतर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस झाले. आणि पुन्हा शिवसेनेचे उपनेता नगरसेवक झाले. सध्या शिवसेनेचे (शिंदे) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख असलेले घाडी पुन्हा नगरसेवक बनले आहेत
आता त्यांना शिंदेंचे निष्ठावान म्हणून उपमहापौरपद दिले असे बोलले जात आहे. पण उपमहापौरपद देऊन एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुंबई महानगरपालिकेतील मुख्य प्रवाहातून दूर केले आहे, असे महापालिकेतील सत्ताकारणाच्या अभ्यासकांना वाटते.
उपमहापौरपद हे महापालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे असले तरी या पदावर आरुढ होणाऱ्या नगरसेवकाला स्वतःचा विचार सभागृहात अथवा कोणत्याही समित्यांमध्ये मांडता येत नाही. कोणत्याही समितीचा सदस्य होता येत नाही. सभागृहात केवळ महापौरांच्या बाजूला बसणे, महापौरांच्या अनुपस्थितीमध्ये सभागृहचे कामकाज बघणे व बाहेर उपमहापौर म्हणून प्रमुख पाहुण्यांची भूमिका बजावणे, एवढेच काम त्यांच्याकडे असते. केवळ फिरायला गाडी, बसायला कार्यालय, सेवेला कर्मचारी मिळतात. पण महापौरांप्रमाणे आलिशान बंगला मिळत नाही.
उपमहापौरपद देणे म्हणजे नगरसेवकाचे पंख छाटण्यासारखे आहे. महापालिकेत स्थायी व सुधार समितीला विशेष महत्त्व आहे. या समितीचे अध्यक्षपद मिळाले नाही तरी चालेल पण किमान सदस्यपद मिळावे यासाठी प्रत्येक नगरसेवकाचा प्रयत्न असतो. मुळात स्थायी समितीच्या हातात पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असल्यामुळे या समितीचे सदस्यपद मिळावे यासाठी नगरसेवक जोरदार फिल्डिंग लावतात.