मुंबई

मुंबई एपीएमसीत तीन दिवसांत १५०० टन बटाट्याची आवक

मोनिका क्षीरसागर

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : मुंबई एपीएमसी घाऊक कांदा बटाटा बाजारात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर बटाट्याची आवक झाली आहे. एरवी २५ ते ३० गाडी होणारी आवक दोन ते तीन दिवसात तब्बल १५० गाडी बटाट्याची म्हणजे १५०० टन बटाट्याची आवक झाली आहे.

आषाढी एकादशीच्या तीन दिवस आधी मुंबई एपीएमसीमध्ये १५० गाडी बटाट्याची आवक झाली असून, तेवढ्याच पटीने बटाट्याचा उठावही होत असल्याचे दिसत आहे. दररोज किमान ५२ गाडी बटाटा विक्री झाल्याची माहिती घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली. उपवासाच्या काळात बटाट्याला वाढती मागणी असते. किरकोळ व्यापा-यांनी तीन दिवसात मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केल्याचे तोतलानी यांनी सांगितले. घाऊक बाजारात २२ ते २६ रूपये किलो बटाट्याचे दर आहेत. तर किरकोळ बाजारात ३५ रूपये किलो दराने विक्री होत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आदी राज्यातून बटाट्याची आवक होते. यामध्ये ज्योती बटाटा वाणाला अधिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

बटाटा हा प्रामुख्याने वेफर्स, साबुदाणा खिचडी,बटाटा भाजी, बटाटा साबुदाणा वडा या उपवासाच्या पदार्थामध्ये वापरला जातो. आषाढी एकादशीला मराठी, हिदी भाषिक कुटुंबात उपवास करतात. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबात वापरासाठी आणि उपवासासाठी किमान दीड ते दोन किलो बटाटा खरेदी केला जातो. हॉटेल व्यावसायिक मोठ्या आकाराचा तर घरगुती वापरासाठी मध्यम आकाराचा बटाट्याचा वापर केला जातो. मध्यम आकाराच्या बटाट्याला मागणी अधिक असल्याचे घाऊक व्यापारी सांगतात. तीन दिवसाआधी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी झाल्यामुळे शनिवारी बटाटा घाऊक बाजारात किलोमागे एक रूपयांनी घसरला. मात्र किरकोळ बाजारात बटाट्याच्या दरात तेजी कायम आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT