मुंबई : ‘नवे क्षितिज’ नावाची दोन-दिवसीय व्याख्यानमाला नेहरू सायन्स सेंटर, वरळी येथे ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केली आहे. ही व्याख्यानमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त असणार आहे. या शताब्दी वर्षात या आधी दिल्ली, बेंगळुरू आणि कोलकाता इथे अशाच व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या होत्या. मुंबईत होणारी व्याख्यानमाला ही या मालिकेतील शेवटची व्याख्यानमाला आहे.
या दोन दिवसांत एकूण चार सत्रे होतील. पहिल्या दिवशी दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत दोन सत्रे होतील. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या कालावधीत दोन सत्रे होतील. परम पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे व्याख्यान पहिल्या दिवशी होईल व दुसऱ्या दिवशी त्यांचा सोबत प्रश्नोत्तरांचे सत्र होईल.
कोकण प्रांताचे संघचालक श्री अर्जुन चांदेकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले, 'विविध क्षेत्रांतील आमंत्रित केलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व्यक्तिमत्त्वे, साहित्यिक, वैज्ञानिक, वैद्यकीय व्यावसायिक, वकील, सामाजिक संस्था संचालक, शिक्षणतज्ज्ञ, विविध क्षेत्रातील कलाकार, खेळ क्षेत्राशी संबंधित लोक, मीडिया मालक आणि संपादक, धर्मगुरू, आर्थिक तज्ज्ञ, सोशल मीडिया इंफ्लुएंसर, जाहिराती क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वे आणि महावाणिज्यदूत यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून निमंत्रणाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. गेल्या काही वर्षांत संघकार्यात सज्जन शक्तींचा सहभाग अनेकपटींनी वाढला आहे.”
संघ शताब्दी वर्षात, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, स्वबोध आणि पर्यावरण संरक्षण या पंच परिवर्तनावर विशेष भर देण्यात आला आहे.
२०२५ च्या विजयादशमीपासून चालू झालेले शताब्दी वर्ष २०२६ च्या विजयादशमीपर्यंत असणार आहे. हे वर्ष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्राप्रती समर्पित सेवेच्या शतकाचे प्रतीक आहे. समाजातील विविध घटकांना जोडण्यासाठी गृह संपर्क, हिंदू संमेलन, प्रबुद्ध गोष्टी संमेलने, सद्भाव बैठक आणि युवा संमेलन यांसह अनेक प्रेरणादायी कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे.