Rohit Pawar Press Conference pudhari photo
मुंबई

Rohit Pawar Press Conference: झिरवाळ प्रकरणात सगळे शांत... त्यातच रोहित पवारांनी विलिनीकरणाबाबतची पत्रकार परिषद पुन्हा पुढं ढकलली

Anirudha Sankpal

Rohit Pawar Press Conference: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात की घातपात अशी शंका उपस्थित करणारे एक प्रेझेंटेशन दिलं होतं. त्यानंतर त्यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत देखील नेमकी चर्चा काय झाली याबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली होती.

आधी ही पत्रकार परिषद १२ फेब्रुवारीला होणार होती. त्यानंतर दिल्ली दौऱ्यावर असलेल्या रोहित पवार यांनी ही पत्रकार परिषद सोमवारपर्यंत पुढं ढकलली. आता ही पत्रकार परिषद काही आठवडे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पुढारी न्यूजचे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी नरहरी झिरवाळ यांचा देखील अँगलबाबत भाष्य केलं आहे.

पुढारी न्यूजचे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे म्हणाले, 'अजित पवार गटाकडून 'विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही' असा दावा वारंवार केला जात होता. या दाव्याला छेद देण्यासाठी रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाचे पुरावे आणि सत्य समोर आणणार होते. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या 'वेट अँड वॉच' धोरण अवलंबल्याने रोहित पवारांना ही परिषद स्थगित करावी लागली आहे.'

पत्रकार परिषद पुढे का ढकलली?

अजित पवार गटातील अस्वस्थता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील अनेक आमदार सध्या अस्वस्थ आहेत. त्यांच्यातील अंतर्गत घडामोडींवर शरद पवार गट लक्ष ठेवून आहे. परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट झाल्याशिवाय कोणतीही अधिकृत भूमिका न घेण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत.

नरहरी झिरवाळ लाच प्रकरण

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीने (ACB) छापा टाकून त्यांच्या कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही बड्या नेत्याने झिरवाळ यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली नाही. या प्रकरणामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळेंचे स्टेटमेंट

सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच 'भाऊ गेला आणि चर्चाही गेली' असे म्हणत या विषयावर बोलण्यास नकार दिला होता. त्यांच्या आणि रोहित पवार यांच्या भूमिकेत विरोधाभास दिसत होता. त्यामुळं आता पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते एका समान निर्णयावर पोहोचल्यानंतरच रोहित पवार माध्यमांसमोर येण्याची शक्यता आहे.

शिवाजी काळे असंही म्हणाले की, ज्या पद्धतीने नरहरी जिरवाळ यांच्या पीएला किंवा त्यांच्या क्लार्कला ट्रॅप करण्यात आलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकाही नेत्याने या सगळ्या संदर्भात कुठलही भाष्य केलेल नाही. पक्षातील मोठे नेते झिरवाळ यांच्या पाठीमागे उभ राहताना पाहायला मिळालेल नाहीयेत. त्यामुळे सध्या ही जी परिस्थिती ओढावलेली आहे त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील वेट अड वॉचच्या भूमिकेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT