

Rohit Pawar Allegations On East Vidarbha Leader: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाबाबत काय झालं हे सांगण्यासाठी रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार होते. मात्र त्यांनी ट्विट करून ही पत्रकार परिषद रद्द झाल्याचं सांगितलं असं असलं तरी आज त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी तो विदर्भातील नेता कोण याबाबत स्पष्टीकरण दिलं. रोहित पवार यांनी मी कोणावरही आरोप करत नाहीये किंवा कोणचं नाव घेत नाहीये. मात्र तुमचीच लोकं नाव घेत आहेत. त्यांच्या प्रमोद हिंदूराव यांनी ते विदर्भातील नेते कोण हे सांगितलं आहे असं वक्तव्य केलं.
रोहित पवार यांनी अजित पवार यांचा विमान अपघात की घातपात याबाबत चौकशी करण्यात यावी असं मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये म्हणालो असल्याचे स्पष्ट केलं. मी कोणावरही आरोप केलेले नाहीत असंही ते म्हणाले, रोहित पवार यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
याच उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, 'सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय पवार तसेच काही वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान आणि अमित शहांची भेट घेतल्याचं माध्यमांकडूनच कळालं. दादांचा जो कुठला अपघात झाला आहे की तो घातपात आहे का हाच एक मुद्दा आज महत्वाचा आहे. हाच मुद्दा त्यांनी मांडला असावा अशी मी आशा करतो. काकी आणि इतर सगळ्यांनीच राजकारण बाजूला ठेवून एकच मुद्दा मांडला असावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे.'
यानंतर पवार यांना पार्थ पवार यांच्याबाबत ही चर्चा केली आहे का असं विचारलं असता त्यांनी १३ दिवस आम्ही दुःखात होतो. त्यामुळं ही चर्चा केलेली नाही. आता १३ दिवसानंतर आम्ही राजकीय बोलू शकतो. आतापर्यंत पार्थ किंवा त्यांच्या कुटुंबाबरोबर कोणतीही चर्चा झालेली नाही.
रोहित पवार यांना पत्रकारांनी अजितदादांना त्या दिवशी जो उशीर झाला तो सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामुळं झाला असा आरोप आहे का असा थेट प्रश्न विचारला. त्यावेळी रोहित पवार यांनी, 'मी आरोप कोणावरच केलेला नाही. माझं असं मत आहे की तपास होणं महत्वाचं आहे. तपास व्यवस्थित होत नाहीये. असं माझं तिथं म्हणणं आहे.'
पूर्व विदर्भातील नेत्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, 'पूर्व विदर्भातील जो नेता आहे ते मी कुठं प्रमोद हिंदूराव यांनी स्वतः सांगितलं आहे की ते प्रफुल्ल पटेल होते. मी त्यांचे नाव घेण्याची गरजच राहिली नाही. त्यांचीच लोकं त्याचं नाव घेत आहेत. मी कुठंही बोलत नाहीये की हे यांनी केलं आहे आणि ते त्यांनी केलं आहे. मात्र हे कसं झालं आहे यासाठी एक व्यवस्थित चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या पायलटपासून जवळच्या व्यक्तींपर्यंत चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे.
दरम्यान, पत्रकार परिषद घेण्याचं कारण रोहित पवार यांनी सांगितलं की, आम्ही प्रेस कॉन्फरन्स एवढ्यासाठीच घेतली की तपास कोणत्या दिशेला जातो का... तपासात उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच सापडलं नाही. तो बिघडला होता. व्हाईस रेकॉर्डिंग बंद होतं अशी फालतू कारणं देता कामा नये. आम्ही काय महाराष्ट्रातील कोणीही ते ऐकून घेणार नाही.'
रोहित पवार यांना हे सगळे तुम्हीच बोलत आहात तिकडून काही येत नाहीये असा सवाल करण्यात आला. त्यावर रोहित पवार यांनी, 'मी भावनिक व्यक्ती आहे. मला जे वाटतं ते मी करतो. ते खूप अनुभवी लोकं आहेत.राजकारणात अनेक वर्षे राहिल्यामुळं राजकारण आणि राजकीय घडामोडींवर त्यांचं पहिलं लक्ष जात अशावं. आज पाहिलं तर त्यांच्याकडून राजकारणाला जास्त महत्व दिलं जात आहे. त्यामुळे अजितदादांचा अपघात झाला की घडवून आणला याकडं त्याचं लक्ष जात नसावं. ते लक्ष देत नसले तरी आम्ही दादांचे कार्यकर्ते आणि नातलग प्रयत्न करतोय आणि लढतोय.' असं उत्तर दिलं.