Sunetra Pawar
मुंबई: अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करताना सुनेत्रा पवार अत्यंत भावूक झाल्या होत्या.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजित दादांनी प्रत्येक निवडणुकीत जीवाचे रान करून लढायचे ठरवलेले असे. "ही माझी शेवटची निवडणूक आहे, आता तीन वर्षे निवडणुका नाहीत" असे ते म्हणायचे, तरीही तितक्याच उत्साहाने ते कामात स्वतःला झोकून द्यायचे. त्या दिवशी दादा सकाळी लवकर कामासाठी निघाले होते, पण त्याच वेळी अपघात झाला. या घटनेचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, "एका क्षणात आपण सगळे पोरके झालो".
दादांना काम आणि फक्त कामच आवडते. त्यामुळे आता सर्व काही बाजूला ठेवून, दादांना आवडणाऱ्या गोष्टी आपण सर्वांनी केल्या पाहिजेत आणि त्यांच्या मनातील स्वप्न साकार केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.