मुंबई

Rohit Pawar| शरद पवारांचा पक्ष NDA ला पाठिंबा देणार? रोहित पवारांचं सूचक विधान

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री, श्री राम मोहन नायडू यांच्‍या राजीनाम्‍याच्‍या मागणीचा पुन्‍नरुच्‍चार

पुढारी वृत्तसेवा

Rohit Pawar on NDA government support

नवी दिल्ली : अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी प्रश्नांचा भडीमार करणारे राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याबाबत सूचक विधान केले आहे. 'अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणाचा योग्य दिशेने तपास होणे गरजेचे आहे. या तपासात अडचणी येत असतील तर वेगळ्यापद्धतीने पाठिंबा द्यावा लागला तर याचा विचार करू', असं त्यांनी म्हटले असून या विधानाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. अजित पवारांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी रोहित पवार हे आक्रमक झाले आहेत. शनिवारी रोहित पवार हे दिल्लीत होते आणि सकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांच्‍या राजीनाम्याची मागणी केली. दुपारी 'पुढारी न्यूज'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी एनडीएबाबत मोठं विधान केले.

विमान अपघातप्रकरणी पुराव्यासह खुलासा केला

'पुढारी न्‍यूज'शी बोलताना रोहित पवार म्‍हणाले की, विमान अपघात प्रकरणी पुराव्यासह खुलासा केलेला आहे. पुरावे तिथे दिलेले आहेत की, आंध्र प्रदेशचे मुख्‍यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्‍या परिवारातील लोक एका कंपनीमध्ये डायरेक्टर आणि मालक आहेत. त्‍यांचे व्‍ही. के. सिंग मालक असणार्‍या व्हीएसआर कंपनीचे एक विमान अजितदादांना बारामतीकडे घेवून जात होते. होतं. व्हीएसआरला कंपनीला आर्थिक पाठबळ तेलगू देसम पार्टीचे कुटुंबातील लोक करतात. चंद्रबाबू नायडूंनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रीपदी राममोहन नायडू यांना बसवले. व्‍ही. के. सिंग यांचे चंद्रबाबू नायडूंच्या कुटुंबाशी व्‍यक्‍तिगत नातेसंबंध आहेत.एसआरचा संचालक रोहित सिंग याच्‍या विवाहाला चंद्रबाबू नायडूंच्या कुटुंबाचे लोक उपस्‍थित होते. अशात अतिजदादांना न्याय कसा मिळणार? महाराष्ट्राला न्याय कसा मिळणार? हे त्यांचे मित्र, त्यांचा आर्थिक व्‍यवहार संभाळत होते. व्हीएसआरला सपोर्ट केला तर दादांना तिथे न्याय मिळणार नाही. या प्रकरणाचा तपासा योग्‍यरित्‍या होणार नाही, असा दावाही त्‍यांनी केला.

...तर मित्रत्वाला तडा गेला असे म्हणावे लागेल

अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी पारदर्शकपणे आणि व्यवस्थित होत नसेल तर मित्रत्वाला तडा गेल्याचे म्हणावे लागेल. आम्ही खोलात जाऊन शोध घेतला नसतो तर या गोष्टी बाहेर आल्या नसत्या. कदाचित काही वर्षांनी या गोष्टी बाहेर आल्या असत्या, असंही रोहित पवार म्हणाले. VSR ला क्लिन चीट देण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

रोहित सिगला जाणीवपूर्वक परदेशात पाठवलं का?

महाराष्ट्रात सध्या विरोधी पक्षनेते नाहीत. देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहेत. त्यांनीही इतर पक्षांच्या मदतीने अजित दादांच्या घात किंवा अपघाताच्या प्रकरणात नीट आणि पारदर्शक तपास व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. रोहित सिंग पळून गेले, असे तुम्ही म्हणत आहात. तो फिरायला किंवा कामानिमित्त गेला असेल, असेही सांगितले जाते. पण त्याला जाणीवपूर्वक बाहेर पाठवले का, असा प्रश्न उपस्थित होतो. इतकी मोठी घटना घडली असताना संबंधित डायरेक्टरला सहजपणे भारताबाहेर जाऊ दिले, हे योग्य आहे का?, असे सवालही त्‍यांनी उपिस्‍थत केले. मायामी (अमेरिका) येथे त्याची कंपनी आहे. दुबई आणि भारतातही त्याच्या कंपन्या आहेत. आता काही विमानं विक्रीसाठी काढली जात आहेत. काल एक विमान विक्रीला काढल्याची माहिती आहे. मग असे सगळे व्यवहार करून ते कायमचे परदेशातच राहिले, तर अजितदादांना न्याय कसा मिळणार? हा मुख्य प्रश्न आहे, असेही त्‍यांनी यावेळी नमूद केले.

शरद पवारांनी राज्यसभेवर जावं ही दादांची इच्छा

शरद पवार यांच्यासोबत काही चर्चा झाली नव्हती. शरद पवार राज्यसभेवर गेले पाहिजे. ते देशातले मोठे नेते आहे, असं अजितदादा म्हणाल्याचं रोहित पवारांनी सांगितले.

... तर एनडीएला पाठिंबा देण्‍याचा विचार होईल

राम मोहन नायडू यांच्‍या राजीनाम्‍याच्‍या मुद्‍यावर चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देसम पार्टीने रालोआ सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर शरद पवारांची राष्‍ट्रवादी केंद्र सरकारला पाठिंबा देणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर रोहित पवार म्हणाले, मी याबाबत भाष्य करण्यासाठी खूप छोटा नेता आहे. मी आमदार आहे खासदार नाही. या गोष्टी शरद पवारांच्या अखत्यारित येतात. तपास करताना काही अडचणी आल्यास वेगळ्यापद्धतीने पाठिंबा देऊन अजित पवारांना न्याय मिळत असेल तर त्याठिकाणी आपण विचार करू शकतो. मात्र, तो नंतरचा विचार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT