Rohit Pawar | पायलटच्या मदतीने अजित पवारांचा घातपात; रोहित पवारांचा आरोप
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विम्याच्या रकमेवरून अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुख्य पायलटचा पगार, त्याची कौटुंबिक परिस्थिती, त्याची गेलेली नोकरी आणि विमानाची किंमत व त्याचा काढलेला विमा यावरून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हा अपघात नसून नियोजित कट असून पायलटच्या मदतीनेच हा घातपात घडवण्यात आला असावा, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी बुधवारी केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुकत खाली कोसळल्याची माहिती समोर आली होती. विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने भीषण रूप घेतले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाचजणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांनी या प्रकरणी अनेक मुद्दे उपस्थित केले असून मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा हा अपघात नसून नियोजित कट असल्याचा दावा केला.
रोहित पवार यांनी सांगितले की, अपघाताच्या ठिकाणाची पाहणी केल्यावर काही बाबी संशयास्पद वाटतात. विमान धावपट्टीवर न पडता बाजूच्या कठीण पृष्ठभागावर आदळले. त्यामुळे त्याचा धक्का अधिक तीव्र झाला. स्फोटाचे मुख्य कारण विमानातील जादा इंधन असू शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, या विमानातील इंधन टाक्या नेहमीपेक्षा जास्त भरलेल्या होत्या. मुंबईहून बारामतीकडे जाताना इंधन पूर्ण क्षमतेने भरले गेले होते; मात्र बारामतीला पोहोचल्यानंतर विमान पुढे जाणार होते, तर तेथेच पूर्ण इंधन भरण्याची गरज काय होती? जर महाराष्ट्रात इंधन स्वस्त आहे म्हणून ते भरले असेल, तर गुजरातमध्ये त्याहून स्वस्त इंधन उपलब्ध होते, असा युक्तिवादही त्यांनी मांडला. त्यामुळे एवढ्या अल्प अंतराच्या प्रवासासाठी टाक्या पूर्ण भरण्याचा निर्णय का घेतला गेला, हे तपासले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. जादा इंधन असल्यास स्फोटाची तीव्रता वाढते, ही शंका आता खरी ठरत असल्याचे ते म्हणाले.
या सर्व बाबींचा विचार करता हा अपघात नसून नियोजित कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा ठाम दावा रोहित पवार यांनी केला. पायलटची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत त्यांनी सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. या प्रकरणातील प्रत्येक तांत्रिक बाबीची तपासणी झाली पाहिजे, तसेच इंधन भरण्याच्या निर्णयामागील कारणांचा शोध घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.
व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या (घातपाताच्या) मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपशी संबंधित ट्रोलर्स त्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आहे. सलग दुसर्यांदा व्हिडीओ सादरीकरण करत त्यांनी व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर दावा केला. विमानाची नोंदणीही बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले. ट्रोल करणारे लोक भाजपमधील मोठ्या नेत्यांशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होईल, असा संदेश
या ट्रोलर्सना त्यांनी ‘पैसे घेऊन काम करणारे’ आणि ‘थर्ड क्लास’ असे संबोधले. सामाजिक माध्यमांवर काही ठरावीक पानांवरून मोहीम राबवली जाते, असा दावा करत त्यांनी सुमीत ठक्कर यांचा उल्लेख केला. 28 तारखेच्या घटनेच्या दोन दिवस आधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होईल, असा संदेश टाकून काही मिनिटांत तो काढून टाकल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
श्वेता सिंग नावाच्या अधिकार्याचा उल्लेख
रोहित पवार यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, विमानतळ प्राधिकरणाकडे दिलेली त्यांची गोपनीय माहिती या ट्रोलर्सपर्यंत पोहोचते. यामागे कोणाची शक्ती आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयामधील श्वेता सिंग नावाच्या अधिकार्याचा उल्लेख करत संपर्कांचा वापर करून मोठे नेटवर्क चालते, असा दावा त्यांनी केला. व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग आणि भाजप नेत्यांचे संबंध असल्याचे सांगत त्याच्या लग्नाला प्रमुख नेते उपस्थित होते, मग पारदर्शक चौकशीची अपेक्षा कशी करायची, असा सवाल त्यांनी केला.
नागरी उड्डाणमंत्री नायडू यांची भूमिका संशयास्पद
अजित पवार विमान दुर्घटनाप्रकरणी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आ. रोहित पवार यांनी केला आहे. या दुर्घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. केंद्रीय मंत्रालय आणि डीजीसीए या दोन्ही संस्था व्हीएसआर या विमान कंपनीला मदत करत असल्याने पारदर्शक चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे माजी अधिकारी, माजी न्यायाधीश, राज्य व लोकसभेतील विरोधी पक्षनेते, कुटुंबीय आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी तसेच सीबीआयमार्फत तपास व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली.
आ. रोहित पवार यांचे प्रश्न आणि मागण्या अशा
* विमानाची वेळ का बदलली, पायलट का बदलले गेले, विमानाच्या देखभालीची स्थिती काय होती?
* व्हीएसआर कंपनी सर्व कायद्यांचे उल्लंघन करून विमाने उडवत आहे. या कंपनीच्या मालकाला ताब्यात घेऊन कंपनीवर तत्काळ बंदी घालावी.
* केंद्रीय विमान मंत्रालय तसेच डीजीसीए या दोन्ही संस्था व्हीएसआरला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणार्या कृती करत आहेत. त्यामुळे या अपघाताची पारदर्शक चौकशी होण्याची शक्यता नाही.
श्र माजी न्यायाधीश, राज्याचे विरोधी पक्षनेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, कुटुंबातील सदस्य यांच्यासह काही तज्ज्ञांच्या समितीच्या निरीक्षणात चौकशी व्हावी

