Rajya Sabha Election Maharashtra Pudhari
मुंबई

Rajya Sabha Election Maharashtra: मविआसमोर सहमतीच्या उमेदवाराचे मोठे आव्हान

महायुतीचे संख्याबळ मजबूत, एका जागेसाठी शिल्लक मतांचे गणित निर्णायक; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्याच्या चर्चेला उधाण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गौरीशंकर घाळे

देशातील 10 राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, या सर्व 37 जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीसमोर सहमतीचा उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या 7 खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार आणि फौजिया खान, काँग्रेसचे रजनी पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले या सात नेत्यांचा समावेश आहे.

विधानसभेत भाजपकडे 131, शिवसेना शिंदे गटाकडे 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) 40 असे महायुतीचे भक्कम संख्याबळ आहे. याउलट, ठाकरे गटाकडे 20, काँग्रेसकडे 16 आणि शरद पवार गटाकडे केवळ 10 आमदार आहेत. या आकडेवारीनुसार, महायुती सातपैकी सहा जागा सहज जिंकू शकते. उरलेल्या एका जागेसाठी महाविकास आघाडीला सहमतीचा उमेदवार द्यावा लागणार आहे. विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीला आपला किमान एक सदस्य निवडून आणण्यासाठीही एकजूट टिकवावी लागणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे एकूण संख्याबळ 288 सदस्यांचे आहे. मात्र, भाजपचे आमदार शिवाजीराव कार्डीले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त झाल्या असून विधानसभेचे संख्याबळ 286 बनले आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सात जागांच्या या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 35.75 इतका कोटा पूर्ण करावा लागणार आहे. या सूत्रानुसार विधानसभेच्या आमदारांची किमान 36 मते राज्यसभेच्या खासदारकीसाठी आवश्यक आहेत.

कुठे किती जागांसाठी निवडणूक

महाराष्ट्रासह इतर 9 राज्यांमध्येही राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये तामिळनाडू (6), पश्चिम बंगाल (5), बिहार (5), ओदिशा (4), आसाम (3), हरियाणा (2), छत्तीसगड (2), तेलंगणा (2) आणि हिमाचल प्रदेश (1) या राज्यांचा समावेश आहे.

शिल्लक मतांचे राजकारण

विजयासाठी 36 मतांचा कोटा बनल्याने विविध पक्षांकडे मते शिल्लक राहणार आहेत. शिल्लक मतांची राजकीय गणिते कशी जुळवली जाणार यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. 131 चे संख्याबळ असलेल्या भाजपला 36 मतांच्या कोट्याने तीन उमेदवार निवडून आणणे सहज शक्य आहे. तीन उमेदवारांना प्रत्येकी 36 मते दिल्यानंतर भाजपकडे 23 मते शिल्लक राहतात. तर, 57 आमदारांच्या शिंदे गटाकडे पहिल्या उमेदवाराच्या 36 मतानंतर 21 मते उरतात. तर, अजित पवार गटाकडे 4 मते शिल्लक राहतात. महायुतीच्या या शिल्लक मतातून सहाव्या उमेदवाराला आवश्यक 36 मतांच्या कोट्याची बेगमी शक्य आहे. त्यानंतरही महायुतीच्या या तिन्ही पक्षांकडे 12 मते उरतात.

महायुतीलाही जुळवावे लागणार समीकरण

विद्यमान संख्याबळानुसार महायुती सहा जागांवर आपले उमेदवार सहज निवडून आणू शकते. यात अजित पवार गटाची एक जागा नक्की आहे. तर, उर्वरित पाच जागांपैकी भाजप 3 जागा लढवून शिंदे गटाला 2 जागा देणार की 4 उमेदवार देत शिंदेना एक जागा सोडणार, हा पेच महायुतीसमोर असणार आहे.

सुनेत्रा पवार आणि मतांच्या कोट्याने मविआची कोंडी

राज्यसभेच्या सात जागांसाठीच निवडणूक जाहीर झाल्याने मतांचा कोटा 36 चा बनला आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याच्या वावड्या उठल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र त्यांनी अद्याप राजीनामा सुपूर्द केलेला नाही. ठाकरे गट आणि शरद पवार गटाला किमान एक जागा जिंकून आणणे सहजसाध्य बनले असते. ही सोय राहू नये, यासाठी सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या राजीनाम्याचा मुहूर्त लांबविण्याची खेळी झाल्याचीही चर्चा आहे.

निवडणूक कार्यक्रम अधिसूचना :

26 फेब्रुवारी 2026

अर्ज भरण्याची अंतिम मुदत :

5 मार्च 2026

अर्जांची छाननी :

6 मार्च 2026

अर्ज मागे

घेण्याची मुदत :

9 मार्च 2026

मतदान व मतमोजणी :

16 मार्च 2026 (सकाळी 9 ते 4 मतदान; सायं. 5 वाजता मतमोजणी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT