

मृणालिनी नानीवडेकर
मुंबई : दहा राज्यांतील राज्यसभेच्या रिक्त होणार्या 37 जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. या सातपैकी 6 जागा महायुती जिंकेल तर एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येईल, अशी सध्याची परिस्थिती आहे. यावेळी निवृत्त होत असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार महाआघाडीकडून की दोन्ही राष्ट्रवादीच्या कोट्यातून पुन्हा दिल्लीत जाणार का? ते निवृत्ती घेणार या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. शिवाय या निवडणुकीच्या मागे विधान परिषदेचीही गणिते दडली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार राज्यसभेच्या निवडणुकीत न उतरता राजकारणातून निवृत्त होणार या चर्चेने जोर धरला असतानाच त्यांनी महाविकास आघाडीतर्फे रिंगणात उतरावे यासाठी महाविकास आघाडी त्यांना साकडे घालणार आहे. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी जोरदार चर्चा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूपूर्वी सुरू होती. कारकिर्दीच्या शेवटला हिंदुत्ववादी शक्तींशी हातमिळवणी केल्याचा आरोप शरद पवार यांच्यावर होऊ नये यासाठी अशी आखणी झाली होती, असेही मानले जाते. आता अजित पवार नसल्याने विलीनीकरणाच्या चर्चा संपल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे जवळपास अशक्य झाले आहे. शरद पवार यांनी राज्यसभेवर निवडून जावे यासाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट त्यांना रिंगणात उतरा असे साकडे घालणार आहेत. शरद पवार रिंगणात उतरले तर निवडणूक बिनविरोध होईल. अशाही हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही तर काँग्रेसने राज्यसभेसाठी शरद पवार यांना पाठिंबा देतानाच विधान परिषदेवर होणार्या निवडणुकात दोन जागा आम्हाला द्याव्यात अशी भूमिका घेतली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
बुधवारी महाराष्ट्राचे काँगे्रसचे प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबईत आले असताना त्यांनी याबद्दलचे सुतोवाच केले. विधान परिषदेतील काही सदस्यांची मुदतही लवकरच संपणार असून उद्धव ठाकरे यांचा विधानपरिषदेचा कालावधी संपणार आहे. त्यांच्या जागी दुसर्या कोणाला नेमले जाते काय की ते स्वत:च निवडून परिषदेत प्रवेश घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीच्या प्रतिसादाची काँग्रेसला प्रतीक्षा
काँग्रेसने विधान परिषदेत दोन जागा मिळाल्या तर अल्पसंख्याक समुदायातील एक नेता आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तेथे पाठवण्याची रचना निश्चित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिसाद कसा मिळतो यावर ते अवलंबून असेल. या संदर्भात लवकरच शरद पवार यांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटात या संदर्भात अद्याप कोणत्याही हालचाली नाहीत. वीस आमदार असलेल्या शिवसेना उबाठाची विरोधी आघाडीत सर्वाधिक मते आहेत. ते शरद पवार यांना पाठिंबा देणार का स्वतः एखाद्या नावाचा आग्रह धरणार याबद्दल अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. उद्धव ठाकरे हे मुलगा तेजस याच्या आजारपणामुळे सध्या फार सक्रिय नाहीत. या संदर्भात लवकरच चर्चा होऊ शकेल असे समजते.
एकनाथ शिंदे करणार दोन जागांवर दावा
एकनाथ शिंदे यांनी आपण भारतीय जनता पक्षाचे मित्र आहोत हे लक्षात घेत एक ऐवजी दोन जागा द्याव्यात, अशी मागणी करायचा निर्णय घेतला असल्याचे समजते. नीलम गोर्हे यांना राज्यसभेवर पाठवले जाईल, असे प्रारंभी बोलले जात होते. मात्र त्या राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या असल्याने दिल्लीला त्यांना पाठवण्याचा निर्णय आता मागे पडला आहे. राहुल शेवाळे यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबई पक्ष संघटना बांधणीत स्वतःला गुंतवले होते त्यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी ही चर्चा होती. मात्र महापालिकेत अपेक्षित यश मिळाले नसल्याने कदाचित त्यांनाही संधी दिली जाणार नाही किंवा तेही आत्ताच राज्यसभेत जाण्यासाठी नकार देतील.
अजित पवार राष्ट्रवादीकडून नरेश अरोरा यांचेही नाव चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार कोण याबद्दलही कमालीची उत्सुकता आहे. राज्यसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व करणार्या सदस्याला सहा वर्षांची कारकीर्द मिळणार असल्यामुळे या जागेबाबत नक्की काय करावे हा प्रश्न सुनेत्रा पवार या स्वतःच लक्ष घालून हाताळणार असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा यांनाही राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्याची जोरदार चर्चा आहे. डिझाईन बॉक्स नावाच्या त्यांच्या संस्थेतर्फे ते अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना निवडणूक सल्ला देत असतात या सर्व घडामोडींना वेळ आहे अशी माहिती देत एका ज्येष्ठ नेत्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली. निवडणुकीची वेळ आली तर भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे मैदानात उतरतो ते लक्षात घेता झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवणे विरोधी पक्षांना आवश्यक वाटते आहे.
पक्षातील कामगिरीचे बक्षीस तावडेंना मिळणार का?
भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे यानिमित्ताने राज्यसभेत दमदार प्रवेश घेणार अशी शक्यताही वर्तवली जाते आहे. बोरिवली विधानसभा मतदारसंघात 2019 साली उमेदवारी नाकारल्यानंतर तावडे यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्यात स्वतःला गुंतवून टाकले आहे. बिहारची जबाबदारी पार पडल्यानंतर सध्या ते केरळ निवडणूक प्रभारी आहेत. केरळात येत्या काही महिन्यातच निवडणूक होणार आहे. मात्र त्यांच्या पक्षनिष्ठेचे पारितोषिक आणि कामगिरीचे बक्षीस म्हणून त्यांना राज्यसभेत पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
विनय सहस्त्रबुद्धे व विजया रहाटकर यांची नावेही चर्चेत
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. विजया रहाटकर यांनाही राज्यसभेने हुलकावणी दिली होती परिषदेतही त्यांना अर्ज भरायला सांगून नंतर तो मागे घेतला गेला होता. त्यामुळे यावेळी त्यांना राज्यसभेवर नेमले जाईल अशी खात्री त्यांचे समर्थक व्यक्त करतात. विनय सहस्रबुद्धे यांनाही दुसर्यांदा संधी मिळाली नाही. राज्यसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा पियुष गोयल यांच्यासाठी जागा आवश्यक असल्याने सहस्रबुद्धे यांचे नाव मागे ठेवण्यात आले होते. आता पियुष गोयल बोरिवली लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यावेळेला सहस्रबुद्धे यांना दिलेला शब्द पाळला जाण्याची शक्यता आहे.