Panvel voter list scam 2025 pudhari photo
मुंबई

Panvel voter list scam 2025: एकाच व्यक्तीला २६८ मुले; मतदार यादीतील 'भयावह' घोळ उघड

मतदार यादीत चक्क एकाच व्यक्तीला २६८ मुले असल्याची नोंद करण्यात आली आहे.

Anirudha Sankpal

Panvel voter list scam 2025: पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील मतदार यादीत एक अत्यंत धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. येथील मतदार यादीत चक्क एकाच व्यक्तीला २६८ मुले असल्याची नोंद करण्यात आली असून, यातील बहुतांश नावे परप्रांतीय तरुणांची असल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकाराविरुद्ध शेकापचे (PWP) माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे.

नेमका प्रकार काय?

प्रभाग क्रमांक २ च्या नवीन मतदार यादीनुसार, एकाच वडिलांचे नाव २६८ वेगवेगळ्या मतदारांच्या नावापुढे लावण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या यादीतील जास्तीत जास्त तरुण हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील असून, ज्या व्यक्तीला 'वडील' म्हणून दाखवण्यात आले आहे, ती व्यक्ती सध्या पनवेलमध्ये वास्तव्यासही नाही.

माजी नगरसेवकांचा 'बोगस मतदाना'चा आरोप

या संदर्भात माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या मते, प्रभाग क्रमांक २ मध्ये सुमारे २००० मतदार बोगस किंवा दुबार (Duplicate) असण्याचा संशय आहे. यापूर्वी निवडणूक विभागाकडे हरकती नोंदवूनही नवीन यादीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे सर्व मतदार परप्रांतीय असून, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी हे 'बोगस मतदार' घुसवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हायकोर्टात धाव आणि प्रशासनावर निशाणा

प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने अरविंद म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी निवडणूक अधिकारी आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त यांना प्रतिवादी (Party) केले आहे. मतदार याद्यांच्या पारदर्शकतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, न्यायालय यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT