

Girish Mahajan on Uddhav Thackeray
नागपूर : उद्धवजी बेछूट आरोप बंद करा, राज्यात एखादी महापालिका जिंकून दाखवा, असे आव्हान भाजप नेते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले.
उद्धव ठाकरेंनी आज (दि.११) विधान भवन परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला ते विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना उत्तर देत होते. प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांना अॅनाकोंडा म्हणणे त्यांच्यावर बेछूट आरोप करणे बंद करावे. स्वतःला आरशामध्ये बघावे. ते स्वतः काय होते आणि काय झाले हे लक्षात घ्यावे, असा सबुरीचा सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
ते म्हणाले की मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी एका मंदिराच्या प्रकरणात दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेस, डी एम के, अखिलेश यादव दुखावले गेले असेल पण उद्धव ठाकरेंना काय झाले होते. त्यांनी न्यायाधीशावर महाभियोग दाखल करण्यास सही केली. उद्धव ठाकरेंना जनाची नाही, तर मनाची लाज वाटायला पाहिजे.
आपण बाळासाहेबांचे सुपुत्र आहोत. केवळ टिकली लावल्यासारखे आज ते अधिवेशनात आले. प्रेस घेतली बेछूट आरोप केले आणि निघून गेले. आरोप करण्याचा सल्ला देणाऱ्याचा सल्ला उद्धवजी घेऊ नका, असेही त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोट्या करणे बंद करावे. ठाकरेंच्या कोट्या टोमण्याची आता जनतेला किळस आली आहे. माझी हात जोडून विनंती आहे उद्धवजी, कोट्या, टोमणे बंद करा नाहीतर तुम्हाला उरले सुरले दुकानही बंद करावे लागेल, अशी बोचरी टीका करीत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना सबुरीचा सल्ला दिला.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काँग्रेसने झिडकारले आहेत आणि उद्धव ठाकरे डोळे मिटून बसले असल्याची कोटी दरेकरांनी केली. तुम्ही केवळ शेतीच्या बांधावर जाऊन पुतना मावशीचे प्रेम दाखवू नका, सभागृहात या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, आता लोकांना केवळ तुमच्या कोट्या टोमने आवडत नाहीत, याकडे लक्ष वेधले.