Panvel CSMT AC Local Train Panic video Pudhari
मुंबई

Local Train Video: ट्रेन स्थानकावर थांबेना, प्रवाशांचा जीव टांगणीला! पनवेल-CSMT AC लोकलचा थरारक VIDEO व्हायरल

Panvel CSMT AC Local Train Panic: पनवेलहून CSMTकडे जाणारी एसी लोकल स्थानकांवर न थांबता पुढे गेल्याने प्रवासी चिंतेत.

Rahul Shelke

Panvel CSMT AC Local Train Panic: पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणाऱ्या एसी लोकलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. धावती लोकल कोणत्याही स्थानकावर न थांबल्याने प्रवासी गोंधळून गेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एसी लोकलच्या डब्यातील काही प्रवासी चिंतेत आणि संभ्रमित अवस्थेत दिसत आहेत. डब्यात सुमारे आठ ते दहा प्रवासी असल्याचे व्हिडीओत दिसते. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.

लोकल पुढे जात असताना दोन ते तीन प्रवासी आपत्कालीन इंटरकॉमजवळ जमा झाल्याचे दिसते. ट्रेन थांबत का नाही आणि नेमके काय घडले आहे, हे जाणून घेण्यासाठी ते मोटरमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. स्थानकांवर लोकल न थांबल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हा व्हिडीओ ‘मुंबई रेल प्रवासी संघा’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे या प्रकाराची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रेल्वे प्रशासनाला जाब विचारला

व्हिडीओ शेअर करताना संघटनेने, “पनवेल ते CSMT ट्रेन कोणत्याही स्थानकावर थांबत नसल्याने प्रवासी घाबरले,” असा दावा केला आहे. या पोस्टमध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग करण्यात आले आहे.

या घटनेवरून संघटनेने रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा परिस्थितीत ट्रेनवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, असा सवाल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, अशी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.

RailwaySeva कडून दखल

व्हायरल पोस्टनंतर रेल्वेच्या अधिकृत RailwaySeva X अकाउंटकडूनही या प्रकरणाची दखल घेण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण पाठवण्यात आल्याचे RailwaySeva कडून सांगण्यात आले. यासोबत मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनाही टॅग करण्यात आले आहे.

लोकल कारशेडकडे जात असल्याचा दावा

दरम्यान, सोशल मीडियावरील एका यूजरने वेगळा दावा केला आहे. संबंधित लोकल कारशेडच्या दिशेने जात होती आणि त्याबाबत प्रवाशांना घोषणेद्वारे माहिती देण्यात आली होती, असा दावा या यूजरने केला. मात्र, या दाव्याची अधिकृत माहिती नाही. तसेच व्हायरल व्हिडीओवरून ही लोकल नियमित प्रवासी सेवा म्हणून धावत होती की कारशेडकडे जात होती, हे स्पष्ट होत नाही.

रेल्वेच्या अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा

या संपूर्ण प्रकाराबाबत मध्य रेल्वेकडून अद्याप सविस्तर स्पष्टीकरण समोर आलेले नाही. लोकल नेमकी कोणत्या कारणामुळे स्थानकावर थांबली नाही, प्रवाशांसाठी कोणती घोषणा करण्यात आली होती आणि त्यावेळी ट्रेन कोणत्या मार्गावर व कोणत्या उद्देशाने धावत होती, याबाबत रेल्वेकडून अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT